मुंबई : नवी मुंबईत ४१ वर्षांची एक महिला पोलिसांच्या संमतीने बलात्काराच्या खोट्या फिर्यादी करून अनेक पुरुषांकडून पैसे उकळण्याचे एक रॅकेट चालवीत असावी, अशी सबळ शंका घेण्यासारखी माहिती समोर आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई पोलीस आयुक्तांना या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले आहेत.या महिलेने गेल्या वर्षभरात कामोठे, सीबीडी-बेलापूर, नेरूळ आणि वाशी एपीएमसी पोलीस ठाण्यांमध्ये विविध सहा पुरुषांविरुद्ध केलेल्या बलात्काराच्या तक्रारींची तसेच एवढ्या गंभीर गुन्ह्याची फिर्याद असूनही यापैकी दोन प्रकरणांत संबंधित पोलिसांनी साधा ‘एफआयआर’सुद्धा का नोंदविला नाही याची आयुक्तांनी चौकशी करावी. याबाबत आयुक्तांनी येत्या महिनाभरात या चौकशीचा अहवाल न्यायालयास सादर करायचा आहे. तसेच चौकशीत जी तथ्ये समोर येतील त्यानुसार संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, असा आदेश न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी दिला. या महिलेने बलात्कार व धमक्या देऊन पैसे उकळण्याच्या केलेल्या फिर्यादीवरून कामोठे पोलिसांनी आनंद कुमार प्रमोद सिंग या ३२ वर्षांच्या तरुणास बंगलोरहून चौकशीसाठी बोलावून घेऊन जानेवारी महिन्यात अटक केली. त्याने केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणीच्या वेळी याच महिलेने गेल्या वर्षभरात नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नितीन कोहली, के. के. अण्णा व अमित शर्मा आणि अवधूत जाधव व पप्पू शर्मा या पुरुषांविरुद्ध अशाच प्रकारच्या बलात्काराच्या फिर्यादी केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आनंद कुमार प्रमोद सिंगला अटक झाल्यावर त्याच्या भावाने ‘आरटीआय’खाली अर्ज करून जी माहिती मिळविली त्यामधून असेही दिसून आले की, ही महिला अशी फिर्याद देते व कालांतराने आमच्यात व्यवसायावरून वाद होता, असे लेखी निवेदन पोलिसांना देऊन फिर्याद मागे घेते. बलात्कार, सामूहिक बलात्कार, धमकावून पैसे उकळणे अशा गंभीर गुन्ह्यांची फिर्याद असूनही पोलीस ‘एफआयआर’ न नोंदविता या महिलेला नंतर फिर्याद मागे घेऊ देतात. ‘आरटीआय’खाली मिळालेल्या या माहितीचे रीतसर प्रतिज्ञापत्र सिंग यांच्या भावाने सादर केले. त्याची दखल घेऊन न्या. मोहिते-डेरे यांनी सिंग यांना १० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला व पोलीस आयुक्तांना वरीलप्रमाणे चौकशीचा आदेश दिला. (विशेष प्रतिनिधी)
खोट्या फिर्यादीद्वारे पैसे उकळण्याचे रॅकेट
By admin | Published: March 21, 2016 3:00 AM