ऑनलाइन लोकमतठाणे दि १८: देशाची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा सर्वसामान्य माणूस आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहांत येईल हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना, मुद्रा योजना अशा कल्पक योजना प्रत्यक्षात आणून खऱ्या अर्थाने गरिबी हटविण्यास सुरुवात केली आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. अश्वमेध प्रतिष्ठान आणि ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजनाचा लाभ घेतलेल्यांना कर्ज वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर यांची प्रमुख उपस्थित होती.मुद्रा कर्ज वितरणात महाराष्ट्र प्रथममुख्यमंत्री म्हणाले की, आजपर्यंत केवळ मोठ्या प्रकल्पांना. उद्योगांना बँका आणि वित्तीय संस्था कर्ज देत होत्या मात्र आता मुद्रा योजनेमुळे अगदी घरी व्यवसाय करणाऱ्या तसेच लघु, मध्यम आणि कुटिरोद्योग करणाऱ्यांना देखील कर्ज मिळून त्यांची आर्थिक प्रगती होणे शक्य झाले आहे. पूर्वी बारा बलुतेदार पद्धतीमुळे गावे समृध्द होती पण जसजसे बलुतेदार संपले तसतसे छोट्या व्यवसायांना उतरती कळा लागली.
या व्यवसायांसाठी कर्जाची काही व्यवस्थाच नव्हती मात्र पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेली मास प्रोडक्शन ऐवजी प्रोडक्शन बाय मासेस ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचलली असून त्यामुळे निश्चितच देशाच्या सामाजिक आर्थिक व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल होईल. आज मुद्रा योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना कर्ज मिळत असून कर्ज वितरणात महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. कर्ज मिळालेल्यांनी ज्या कारणांसाठी कर्ज घेतले त्यासाठीच वापरावे असेही त्यांनी सांगितले.
सामान्यांना आर्थिक अधिकारिता मिळेलजनतेची सेवा करणारे कार्यक्रम आपल्या वाढदिवशी करावेत असा संदेश देणाऱ्या पंतप्रधानांचा गौरव करून मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वी ज्याप्रमाणे गरिबी हटाव ची केवळ घोषणाच दिली जायची पण कार्यक्रम काही नसायचा. पण आता देशातील सर्व नागरिकांची बँक खाती उघडण्याची जनधन योजना असो किंवा मुद्रा योजना असो, या माध्यमांतून देशातील गरीब, सामान्य माणूस खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि त्याला आर्थिक अधिकारिता मिळेल.
उत्तर मुंबईत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात झोपडपट्टीतील २५०० कुटुंबाना प्रधानमंत्री उज्वल योजनेतून गॅस शेगड्या देण्यात आल्या याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले कि, पंतप्रधानांनी गॅस सबसिडी न घेण्याचे आवाहन केल्यानंतर देशातील १ कोटी लोकांनी सबसिडी सोडून दिली. यामुळे १४ हजार कोटी रुपये वाचले. पंतप्रधानांच्या जनधन योजनेत १२ कोटी खाती उघडण्याचा विक्रम झाला. सरकारकडून विविध लाभार्थींना मिळणारी रक्कम, अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा होत असल्याने गैरव्यवहार कमी होण्यास मदत झाली.
आपला देश तरुणाईचा आहे हे ओळखून पंतप्रधानांनी कौशल्य विकासावर भर दिला, तरुणाई, लोकशाही आणि मागणी या तीन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत त्यामुळे आपल्या देशातील बाजारपेठ मजबूत करून त्याचा फायदा आपल्या लोकांना आणि इतर देशांनाही व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. ४हजार ६०० जणांना कर्ज मंजूरयाप्रसंगी अश्वमेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयुरेश जोशी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले कि ठाणे जनता सहकारी बँकेच्या मार्फत ४ हजार ६०० जणांना मुद्रा योजनेचे कर्ज मंजूर झाले आहे. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्याच्या हस्ते डिंपल सरिता, अनुपम गोडबोले, वंदना देसाई, अमर विश्वकर्मा, सरिता शिंदे, संगीता महाडिक यांना कर्जाचे धनादेश देण्यात आले. याप्रसंगी टीजेएस बी बँकेचे अध्यक्ष नंदकुमार मेनन, संचालक विद्याधर वैशंपायन, व्यवस्थापकीय संचालक सुनील साठे यांचीही उपस्थिती होती