ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - केंद्र आणि राज्यात सत्तेतून पायउतार झालेल्या काँग्रेसची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली असल्याचं दिसत आहे. 15 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर राज्यात आधी सत्तेतून पायउतार आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सुटलेली साथ यामुळे काँग्रसेची आर्थिक संकटं वाढत चालली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राज्यातील सर्व आमदारांनी एका महिन्याचा पगार पक्षाला दान करावा, असा प्रस्ताव महाराष्ट्र काँग्रेसच्या विचाराधीन असल्याची चर्चा आहे.
"आम्ही सत्तेत नसून निधी मिळण्याचे स्रोतही कमी झालेत ही वस्तुस्थिती आहे. यावर उपाय म्हणून राज्यातील सर्व आमदारांनी त्यांचा एक महिन्याचा पगार (जवळपास 1 लाख 25 हजार ते दीड लाख) पक्षाला दान करावा असा प्रस्ताव आहे. असं केल्यास जवळपास 60 ते 70 लाख रुपये जमा होतील. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांसंबंधी अंतिम निर्णय घेतील. पक्षाचा निधी उभारण्याचे स्रोत वाढवण्याला सध्या प्राधान्य असेल", असं काँग्रसेच्या एका वरिष्ठ नेत्याने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं आहे.
केंद्र आणि राज्य दोन्हीकडे भाजपाची सत्ता असल्याने सत्तेसोबत देणगी देणा-यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. देणगीदार काँग्रेसऐवजी भाजपलाच पसंती देत असून काँग्रेसचा वाटाही त्यांच्याकडे जात आहे. आधी काँग्रेसला प्राधान्य देणारे आता भाजपाला प्राधान्य देत आहेत. देणगीसाठी काहीच स्त्रोत नसल्याने काँग्रेसची राज्यातील आर्थिक परिस्थिती खालावली आहे, असंही काँग्रेसच्या नेत्याने सांगितलं.