राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघातही आज मतदान होत आहे. येथे महायुतीकडून सुनेत्रा पवार, तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे, असा सामना होत आहे. मात्र, प्रतिष्ठा पणाला लागली आहे, ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची. दरम्यान, मनी आणि मसल्स, हे आपण महाराष्ट्रात कधी बघितलेलं नाही. हे पहिल्यांदा बघत आहोत, असे म्हणत, नात्याला गालबोट लावण्याचे काम अदृष्य शक्तीमुळे झाले, असे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्या बारामतीत पत्रकारांसोबत बोलत होत्या.
काय म्हणाल्या सुप्रिया? -सुप्रिया म्हणाल्या, "मला एका गोष्टीचे दःख वाटते, मनी आणि मसल्स, हे आपण महाराष्ट्रात कधी बघितलेलं नाही. हे पहिल्यांदा बघत आहोत. मला असं वाटतंय, काय टीव्ही सीरियल बघतेय, की कुठला सिनेमा बघतेय मी. मला तर विश्वासच बसत नाहीय की एवढ्या प्रेमाने ही जी नाती आम्ही जपून ठेवली होती, सहा दशकं पवार साहेबांनी. ही नाती प्रेमाने आणि विश्वासाने जोडलेली होती. त्याला गालबोट लावण्याचे काम या अदृष्य शक्तीमुळे झाले आहे. ही खरंच मला तरी दुःख देणारी गोष्ट आहे."
"बारामती मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत केवळ 27.5 टक्के मतदान झाले आहे, काय वाटते, असे विचारले असता, सुप्रिया यांनी, आतापर्यंत केवळ एवढेच मतदान झाले? असे म्हणत आश्चर्य व्यक्त केले आणि म्हणाल्या, अस्वस्थ करणाऱ्या धमक्या, हे पैसे वागैरे, लोकांना आवडत नाही हो. ही आपल्या सर्वंसाठीच फार दुःख देणारी गोष्ट आहे की, एका सशक्त लोकशाहीत, जिथे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशातल्या अनेक लोकांनी स्वतःचं उभं आयुष्य या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी दिलं. त्या सशक्त लोकशाहीत आज अशा घटना आपल्या महाराष्ट्रात... या महाराष्ट्राला गालबोट आणि दृष्ट लागली आहे का या अदृष्य शक्तीची असं मला वाटायला लागलं आहे," असेही सुप्रिया म्हणाल्या.