आर्थिक योजनांचे पैसे आता महिन्याच्या ५ तारखेला खात्यात होणार जमा; अजित पवारांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 06:10 PM2024-06-29T18:10:01+5:302024-06-29T18:10:18+5:30
आर्थिक सहाय्याच्या योजनांचे पैसे महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
राज्यातील सर्वसामान्य, वंचित-उपेक्षित, आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.
पॉईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून आमदार बच्चू कडू यांनी दुर्बल घटकांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळत नसल्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी आर्थिक सहाय्याच्या योजनांचे पैसे महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे म्हटलं आहे. "तीन महिने झाले दिव्यागांना पैसे मिळाले नाहीत. संजय गांधी योजनेतून १५०० हजार रूपये मानधन देण्यात येते. ते तीन महिन्यांपासून मिळाले नाहीत. केंद्र सरकारनं एक वर्षापासून दोनशे रूपये दिले नाहीत. हा पाठपुरावा केला पाहिजे. श्रावणबाळ योजनेत केंद्राचा हिस्सा दोनशे रुपये आहे. फक्त १३०० रूपये आपण देतो. यात लक्ष घालणं फार महत्वाचं आहे," असं बच्चू कडू म्हणाले.
"आपल्याला तर दर पाच तारखेला पैसे भेटतात. मग, त्यांच्याबाबत ही व्यवस्था का होत नाही. अजितदादांकडून आम्हाला अपेक्षा आहे. श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेला पाच तारखेपर्यंत पैसे भेटले पाहिजेत, अशी तसदी घ्या. त्यावर अजितदादा तुम्ही कुठेतरी बोला सांगा की एवढ्या दिवसांत आम्ही पाच तारखेच्या आतमध्ये पैसे देऊ," असेही बच्चू कडू म्हणाले.
"अधिवेशनातील कामकाज संपल्यानंतर वित्त विभागाच्या सचिवांशी चर्चा करून याबाबतच्या वस्तुस्थितीची माहिती घेण्यात येईल. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांसाठी राज्य शासनाने निधीची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे या योजनांमधून मिळणारे आर्थिक सहाय्य वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणे गरजेचे आहे. आर्थिक योजनांच्या सर्वच योजनांचे पैसे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मिळण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील," असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.