नाशिक - सरकार बदलण्यासाठी आम्ही १ खोका काय १ रुपयाही घेतला असेल तर आमची नार्कोटेस्ट करा. तुम्ही किती खोके मातोश्री आणि वर्षा बंगल्यावर घेतले, कुणाकडून घेतले अशा १० कंत्राटदारांची नावे मी सांगतो. जर हे खोटे वाटत असेल तर उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करा असं खुलं आव्हान आमदार सुहास कांदे यांनी दिले आहे.
आमदार सुहास कांदे म्हणाले की, आम्ही जर १ रुपया जरी घेतला असेल तर आमची नार्कोटेस्ट करा. तीदेखील खुली असावी. कॅमेऱ्यासमोर हवी. आम्ही हिंदुत्वासाठी सरकार बदललं. ज्यांनी बाळासाहेबांना शिव्या दिल्या त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसलेत. मग आम्ही कोणाकडे बघायचं? ज्यांच्याविरोधात आम्ही निवडणूक लढवली, ज्यांना आम्ही पाडलं. लोकांनी आम्हाला निवडून दिले. त्या विरोधकांसोबत बसायचं हे उद्धव ठाकरेंना कसं आवडलं माहिती नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच ज्यांच्यासोबत आम्ही निवडणूक लढवली, त्यांच्यासोबत आम्ही सरकारमध्ये गेलो. भुजबळांनी बाळासाहेबांना टी बाळू म्हटलं होते त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसवले म्हणून मी गेलो. बहुमत चाचणी होण्याआधी राजीनामा देण्याची उद्धव ठाकरेंना गरज काय होती? मी सगळं एकाचवेळी सांगणार नाही. आज मी श्रीधर पाटणकरांचे नाव घेतले. हळूहळू सगळे पुरावे समोर देईन असाही इशाराही आमदार सुहास कांदे यांनी दिला.
...म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला; आ.सुहास कांदेंचा मोठा दावा
दरम्यान, मी आमदार या नात्याने सांगतोय, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा हा श्रीधर पाटणकर यांची अटक टाळावी यासाठी दिला. पाटणकरांच्या चौकशा थांबवण्यासाठी राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करावी म्हणजे पुरावे मिळतील. एका कंपनीकडून किती हजारो कोटी मिळाले ते माहिती पडेल. विधानसभेच्या पटलावर १० कंपन्यांच्या व्यवहाराबाबत चौकशी अहवाल ठेवला आहे, याचे लेखापरिक्षण केले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. त्यामुळे जे सत्य आहे ते उघड होईल असंही आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.