मुंबई : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत होते, तेव्हा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानींबरोबर बैठका सुरू होत्या. शरद पवार गटाचे आमदार अदानीची गाडी चालवत होते, तर उद्धव ठाकरे अदानींबरोबर बैठका घेत होते. सत्तेत होते, तेव्हा मलिदा काढण्याची भूमिका होती, सत्ता गेल्यानंतर आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सत्तेत असताना उद्धव ठाकरे धारावीतील पात्र ६० हजार रहिवाशांना घरे देणार होते, आम्ही मात्र सर्व २ लाख रहिवाशांना घरे देण्याचा निर्णय घेतला. धारावीकरांनी विरोधकांच्या राजकारणाला बळू पडू नये, ते स्वतःच्या स्वार्थासाठी दिशाभूल करत आहेत.
मविआ सरकारने ४ प्रकल्पांनाच मान्यता दिली होती, तर आम्ही १२४ प्रकल्पांना मान्यता दिली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पुन्हा सत्तेत येऊ
लाडकी बहीण, भाऊ, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, मुली यांच्यासाठी आम्ही योजना लागू केल्या. दोन वर्षांत केलेल्या कामाचे समाधान आहे, ते लोकांच्या चेहऱ्यावरही दिसत आहे. त्यामुळे महायुती सरकार पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत येईल.
नरेंद्र मोदी ‘एक हैं तो सेफ हैं’ म्हणतात त्यात काय चूक आहे. आपण एक का होऊ नये?, एक होऊन का मतदान करू नये? काँग्रेसचे नेते मात्र विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात, पाकिस्तानची भाषा बोलतात म्हणून आपल्याला एक होण्याची गरज आहे. मोदींनी कोणत्या धर्माचा उल्लेख केला का?, असा सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
मतदान संपले की लाडकी बहीण योजनेचा हप्ता
विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली, पण आम्ही या योजनेचे पैसे वेळेवर दिले. विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले की लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.