ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगोलियाला एक अब्ज डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा करून भारताच्या आर्थिक ताकदीची चुणूक दाखवली. मात्र हीच सढळता पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील शेतकरी व जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात भरडल्या जाणार्या कोकणी जनतेच्या बाबतीत दाखवली तर बरेच होईल असे सांगत शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यामुळे महाराष्ट्रापेक्षा मंगोलियाची जनता भाग्यवान म्हणावी लागेल. अशी टीका त्यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच मंगोलियाला भेट दिली, त्यावेळी त्यांनी मंगोलियाला एक अब्ज डॉलरची मदत देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या या निर्णयावरून त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेच त्यांना लक्ष्य केले आहे.
दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होण्यासाठी पंतप्रधानांनी एक अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले. मंगोलियात पायाभूत सुविधांच्या विकासाची गरज आहे व ही जबाबदारी पंतप्रधानांनी कर्तव्य म्हणून स्वीकारली आहे. मात्र एक अब्ज डॉलर हा लहान आकडा नव्हे, त्याचे रुपयांत रुपांतर केल्यास आकडा समोर येईल तो पाहून महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या हजारो शेतकर्यांचे आत्मे गोंधळून जातील, असे ठाकरेंनी अग्रलेखात म्हटले आहे. सावकारी तसेच बँकांच्या कर्जविळख्याने महाराष्ट्रातील शेतकरी मेला आहे व मरतो आहे. गारपीटग्रस्त, अवकाळग्रस्त शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आजही आहे. महाराष्ट्रातून मदतीसाठी योग्य प्रस्ताव गेला नसल्याने शेतकरी मदतीविना तडफडतो आहे असे खुद्द केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जाहीर केले. त्यामुळे खर्याचे खोटे व खोट्याचे खरे करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, पण महाराष्ट्रापेक्षा मंगोलियाची जनता भाग्यवान म्हणावी लागेल. यापूर्वी भूतान वगैरे राष्ट्रांनाही आमच्या पंतप्रधानांनी भरघोस आर्थिक मदत केली आहे. शेजारच्या लहान व गरीब राष्ट्रांना मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे व ती एक विदेश नीतीसुद्धा आहे. लहान व विकसनशील राष्ट्रांना हिंदुस्थानसारख्या मोठ्या राष्ट्रांकडून ही अपेक्षा असते व आमचे पंतप्रधान बाहेर जातात तेव्हा अशा राष्ट्रांना सढळहस्ते मदत करीत असतात. मात्र हीच सढळता व सहृदयता आमच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या बाबतीत दाखवली व जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात भरडल्या जाणार्या कोकणी जनतेच्या बाबतीत दाखवली तर बरे होईल, असा टोला त्यांनी लेखात हाणला आहे. केंद्राच्या व महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी मिळून शेतकर्यांच्या आत्महत्या व रखडलेल्या मदतीचा प्रश्न तेवढा निकाली लावावा हीच प्रार्थना, असेही त्यांनी लेखात नमूद केले आहे.