पूजा दामले - मुंबई
दीड महिन्यापासून कृत्रिम हातांनी दैनंदिन व्यवहाराचा सराव करणारी मोनिका आता लिहिण्याच्या बरोबरीने टायपिंग करते आहे. याचबरोबर तिने स्वत:च्या हाताने खाण्यासदेखील सुरुवात केली आहे. येत्या दोन आठवडय़ांत तिला डिस्चार्ज मिळू शकतो, असे मोनिकाच्या वडिलांनी सांगितले.
मोनिका आता कृत्रिम हाताचा वापर उत्तम करत आहे. सरावाच्या तिस:याच दिवशी तिने ‘मोनिका’ असे स्वत:चे नाव लिहिलेले होते. रोज तिला तीन ते चार तास कृत्रिम हातांनी विविध कामे करण्याचा सराव दिला जातो. स्नायूंच्या साहाय्याने कृत्रिम हाताची हालचाल कशी करायची, याविषयीचे तंत्र तिने अतिशय चांगल्या प्रकारे आत्मसात केले आहे. पहिले काही दिवस कृत्रिम हात लावल्यावर तिला थोडेसे अवघडल्यासारखे व्हायचे. मात्र आता तिला कोणताही त्रस होत नाही.
दहावीनंतर कॉम्प्युटर शिकण्यासाठी मी एमएचसीआयटीचा कोर्स केला होता. तेव्हा मी टायपिंग शिकले होते. आता मी कृत्रिम हाताच्या साहाय्यानेही टायपिंग करायला शिकले आहे. तेव्हा इतका वेग आलेला नाही, मात्र ब:यापैकी वेगात टायपिंग करता येते, हे सांगताना मोनिकाच्या चेह:यावर हास्य होते. मोनिकाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. मी आता स्वत:च्या हातांनी खायला पण लागले आहे. थोडेफार खाऊ शकते, असे मोनिकाने सांगितले.
मोनिकाचा सराव चांगला सुरूच आहे. महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणी मोनिकाची वाट पाहत आहेत. मोनिकाची अकरावीची परीक्षा अपघातामुळे बुडाली होती. आधी महाविद्यालय तिची अकरावीची परीक्षा घेणार होते, मात्र आता तिची परीक्षा न घेता थेट बारावीच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाने सांगितले आहे. आता बरीचशी कामे ती स्वत: हाताने करत असल्याचे मोनिकाच्या आईने सांगितले.