ऑनलाइन लोकमत
नागपूर : साधारणत: एखादा ‘भाई’ किंवा ‘डॉन’च्या टोळीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालेली दिसून येते. परंतु उपराजधानीत चक्क माकडांच्या टोळीच्या धुमाकूळाने नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील बजेरिया परिसरात १५ हून जास्त नागरिक या टोळीच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. यासंदर्भात प्रशासनातील अधिकारीदेखील हतबल असल्याचे दिसून येत आहे. या ‘मंकी गँग’ची दहशत इतकी आहे की दिवसाढवळ्यादेखील लोक एकटे घराबाहेर निघण्यासाठी विचार करत आहेत.
बजेरीया, भालदारपुरा परिसरात मंगळवारी तीन नागरिकांना माकडांच्या टोळीने हल्ला करून जखमी केले. या परिसरात माकडांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या २ महिन्यांपासून ते कुणावर हल्ला करून चावा घेत जखमी केले आहे. या माकडांच्या टोळीची दहशत एवढी आहे की, लोक घराबाहेर पडायलाही घाबरत आहे.
भालदारपु-यातील विजय बिहुलिया यांच्यावरही माकडांनी मंगळवारी सकाळी हल्ला करत त्यांच्या मांडीला आणि पायाला चावा घेतला. लहान मुलांवरदेखील ही टोळी हल्ला करत असून तरुणांनादेखील सोडलेले नाही. कुणाच्या पायाला १२ टाके लागले आहेत, तर कुणाचा पाय या मर्कटलीलांमुळे जखमी झाला आहे.