जुन्नर (खोडद) : उपद्रवी वानराला पकडण्यासाठी ओझर येथील वनरक्षक कांचन ढोमसे यांनी स्वतःलाही पिंजऱ्यात कोंडून घेतल्याचे बघायला मिळाले. जीवावर उदार होऊन ढोमसे यांनी केलेल्या या धाडसाचे कौतुक होत आहे.
बिबट्याने नरभक्षक झाल्यावर प्राण्यांसह माणसांना ठार करण्याची अनेक उदाहरणे आपण बघितली आहेत. मात्र हिवरे बुद्रुक (ता.जुन्नर) येथे एका वानराने उच्छाद मांडला होता. नागरिक,शाळेतील विद्यार्थी यांच्यावर हे वानर धावून जात होते. १ ऑगस्टला हे वानर येथील अनिता भोर या महिलेच्या व कृष्णा दप्तरे या विद्यार्थ्याच्या अंगावर धावून गेले होते. घाबरून जाऊन खाली पडल्याने त्यांना दुखापत झाली होती. सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर वनखात्याचे वनपाल मनीषा काळे,वनरक्षक कांचन ढोमसे व आदींनी त्याच दिवशी हिवरे गावात येऊन वानराला पकडण्यासाठी प्रयत्न केले मात्र नागरिकांनी गर्दी मोठ्या प्रमाणात केल्याने वानराला पकडणे अवघड झाले होते.
सोमवारी ( दि.६) पुन्हा या वानराने नागरिकांना त्रास देण्यास सुरुवात केली.नागरिकांनी वनरक्षक कांचन ढोमसे यांना याबाबत माहिती दिली.कांचन ढोमसे या तात्काळ घटनास्थळी आल्या ,वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या वानराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले.वानर नागरिकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते,हीच बाब लक्षात घेऊन कांचन ढोमसे यांनी त्याच्या जवळ जाऊन त्याला गोंजारण्याचा प्रयत्न केला,वानर त्यांच्या मागे मागे येत होते,याच संधीचा फायदा घेऊन कांचन ढोमसे या येथे लावलेल्या पिंजऱ्यात जाऊन बसल्या, क्षणाचाही विचार न करता हे वानर देखील त्यांच्या पाठोपाठ जाऊन ते देखील त्या पिंजऱ्यात जाऊन बसले.
वानर पकडण्याची मोहीम आता फत्ते झाली होती पण एक धोका वाढला होता तो म्हणजे वानराने ढोमसे यांच्यावर हल्ला केला तर ढोमसे यांच्या जीवावर बेतले असते. दुसरीकडे पिंजऱ्या बाहेर असणाऱ्या सुधीर भुजबळ,विश्वास शिंदे, ग्रामस्थांनी वनकर्मचाऱ्यांनी कांचन ढोमसे आणि वानर या दोघांमध्ये तार टाकून अडथळा निर्माण केला आणि ढोमसे यांना सुखरूप बाहेर काढले आणि वानराला देखील नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. आणि अखेर वानर प्रकरणाची यशस्वी सांगता झाली.