श्यामकुमार पुरे
सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर): जीवनशैली बदलामुळे अनेक वानरांना कर्करोग होत असल्याचे समोर आले असून, तालुक्यातील तोंडापूर येथील कर्करोग झालेल्या एका वानरावर शुक्रवारी उपचार करून त्याला जामनेर येथे पाठविण्यात आल्याची माहिती जैवविविधता संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी दिली.
पर्यावरण व वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्य करणारे सिल्लोड येथील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. संतोष पाटील हे गेल्या दहा वर्षांपासून पक्षी, कीटक, साप, माकड आदी जखमी व आजारी वन्यजीवांवर मोफत उपचार करतात. याच अनुषंगाने एक वानर जखमी असल्याची माहिती त्यांना तोंडापूर परिसरातील ग्रामस्थांकडून मिळाली. जखमी वानरावर उपचार करत असताना वानरास जखम नसून गुद्वाराचा अँनो रेक्टल कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्या जखमेतून पूसदृश स्त्राव वाहत होता व त्यातून दुर्गंधीपण येत होती. त्यावर योग्य उपचार केल्यानंतर वानराच्या जखमेतून चार दिवसांत दुर्गंध व स्त्राव वाहने बंद झाले. त्यानंतर निगराणी व अधिक उपचारासाठी त्यास जामनेर येथे हलवण्यात आले आहे.
जीवनशैली बदलाचे बळी आता वानरहीबऱ्याच पर्यटन ठिकाणी पर्यटक माकडांना चिप्स, कुरकुरे व इतर पॅक फूड देतात. त्यात असलेले प्रेझर व्हेटिव्ह हे माकडांना हानिकारक ठरते. पोळी सुद्धा त्यास हानिकारक आहे. कारण त्यात ग्लूटेन असते व ते पचवणे माकडाला जड जाते. पर्यटकांनी काळजी घ्यावी. शिजवलेला व प्रक्रिया केलेला मानवी आहार माकड व तत्सम जिवांना देऊ नये, त्यांचा नैसर्गिक आहार, झाड पालाच योग्य आहे. - डॉ. संतोष पाटील, जैवविविधता संवर्धक, अभिनव प्रतिष्ठान
किती प्रमाण आढळले?डॉ. पाटील यांना आतापर्यंत दोन माकडांत हा आजार आढळला आहे. ०.३ इतके कर्करोगाचे प्रमाण वानरात आढळत आहे. हे प्रमाण वाढत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. काही विशिष्ट विषाणू व जीवन शैली बदल ही कारणे या मागची कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.