लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: शेतकरी व नागरिकांसाठी आनंदवार्ता असून, ज्याची सर्व जण आतुरतेने वाट पाहतात, तो मान्सून अखेर केरळ व ईशान्य भारतात गुरुवारी (दि. ३०) अंदाजानुसार एक दिवस आधीच दाखल झाला. त्याची वाटचाल वेगाने होत असून, लवकरच महाराष्ट्रातही दाखल होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
गेल्या वर्षी खूपच कमी पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळाचे सावट आहे. म्हणून पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे. काही दिवसांपासून देशात तापमानाचा पारा चांगलाच कडाडला आहे. विदर्भ, मराठवाड्यात उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यातच पुढील आठवड्यात मान्सून राज्यात दाखल होत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
यंदा धो-धो बरसणार!
दरवर्षी मान्सून केरळमध्ये १ जून रोजी दाखल होतो. यंदा मात्र दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. यापूर्वी अंदमान निकोबारमध्ये मान्सून वेळेपूर्वीच म्हणजे १९ मे रोजी दाखल झाला. त्यानंतर मान्सूनची वाटचाल चांगली राहिली आहे. यंदा देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
आतापर्यंत कधी आला मान्सून?
वर्ष दाखल अंदाज
- २०१९ ८ जून ६ जून
- २०२० १ जून ५ जून
- २०२१ ३ जून ३१ मे
- २०२२ २९ मे २७ मे
- २०२३ ८ जून ४ जून
- २०२४ ३० मे ३१ मे