लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : हवामान विभागाने केलेल्या भाकितानुसार एक दिवस अगोदरच नैऋ त्य मोसमी पावसाचे आग्नेय बंगालचा उपसागर, निकोबार द्वीपसमूह, संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागांत आगमन झाले आहे़ रविवारी दुपारी हवामान विभागाने मान्सूनचे आगमन झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. अंदमान परिसरात पडत असलेला पाऊस, वाऱ्याचा वेग आदी बाबी लक्षात घेऊन, मान्सून दाखल झाल्याचे घोषित करण्यात आले आहे़ पुढील ७२ तासांत बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागरात आगमन होण्याच्या दृष्टीने अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. सध्या दक्षिण भारतात अनेक ठिकाणी पाऊस पडत असून, पुढील चार दिवस अंदमान, निकोबार द्वीपसमूह परिसरात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़ अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, तसेच तामिळनाडूच्या अंतर्गत भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ असा होतो पावसाचा प्रवाससर्वसाधारणपणे दक्षिण-पश्चिम मान्सूनचे आगमन २० मे रोजी अंदमानच्या समुद्रात होते. त्यानंतर, २५ मेपर्यंत अंदमान बेट, श्रीलंकेपासून म्यानमारपर्यंत मान्सून येतो. त्यानंतर १ जून रोजी केरळ येथून प्रत्यक्ष भारतीय उपखंडात मान्सूनचा प्रवेश होतो़. मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतामध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी, तर कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी रविवारी पाऊस झाला़ २४ तासांत मध्य महाराष्ट्र व विदर्भात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे़ शहरांमधील कमाल तापमान पुणे ३७़१, जळगाव ४३़८, कोल्हापूर ३५़७, मालेगाव ४३़६, नाशिक ३६़२, सोलापूर ४१, मुंबई ३५़२, रत्नागिरी ३४़७, पणजी ३५़३, भिरा ४०़५, औरंगाबाद ४०़६, परभणी ४३, नांदेड ४२, अकोला ४५़७, अमरावती ४४़६, बुलडाणा ४२़६, ब्रम्हपुरी ४६़२, चंद्रपूर ४३़८, गोंदिया ४३़२, नागपूर ४४़७, वर्धा ४५़५, यवतमाळ ४३़५़ (अंश सेल्सिअस)
मान्सून अंदमानात!
By admin | Published: May 15, 2017 5:54 AM