मुंबई : पूर्व विदर्भातून राज्यात प्रवेश करणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी पावसाचे अखेर रविवारी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकणात आगमन झाले. पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणारा बळीराजा त्यामुळे सुखावला आहे. पुढील ४८ तासांत मान्सूनला संपूर्ण राज्य व्यापण्यास अनुकूल परिस्थिती आहे़ कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे़ मराठवाड्यात औरंगाबाद वगळता सर्व जिल्ह्यांत रविवारी संपलेल्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यात वीज पडून एक मजूर ठार झाला. उस्मानाबादमध्ये शनिवार - रविवारी पावसाने हजेरी लावली. नांदेड व लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. बीडमध्ये रिमझिम झाली. हिंगोली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही रिमझिम झाली. शनिवारी परभणी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर रविवारीही भूरभूर सुरूच होती़ जालना जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भात अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा धरण परिसरात रविवारी मान्सूनचे आगमन झाले़ शनिवारी रात्री नगरला हलक्या सरी झाल्या. कर्जत तालुक्यात ७़ २ मि़मी़ पाऊस पडला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)मराठवाडा सुखावला रविवारी मराठवाड्यात औरंगाबाद वगळता सर्वत्र पावसाचे आगमन झाले. नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात २४ तासांत ४१़८८ मि.मी. पावसाची नोंद झाली़ उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर आणि उमरगा तालुक्यात चांगल्या पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात २०़७ मि.मी. पाऊस झाला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी पावसाचे पुनरागमन झाले. रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, दापोली, राजापूर, गुहागरमध्ये जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किरकोळ सरी पडल्या. रविवारी मुंबई आणि उपनगरांत कोसळेलल्या मान्सूनपूर्व सरींनी मुंबापुरी थंडावली. मान्सून पुढील २४ तासांत मुंबईतही दाखल होणार आहे. सातारा, सांगलीत हजेरीसांगली जिल्ह्यात दुष्काळी जत, कवठेमहांकाळ तालुक्यांत रविवारी पावसाने हजेरी लावली. कवठेमहांकाळमध्ये ओढे, नाले भरून वाहत होते. शिराळा, तासगावमध्ये सरी झाल्या. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटावमध्ये जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. खटाव तालुक्यात बंधारे, ओढ्या-नाल्यातून पाणी खळाळून वाहिले. माण तालुक्यात दुपारी तासभर पाऊस पडला. सोलापूर जिल्ह्यातही रिमझिम पाऊस झाला.