लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वेगवान वाटचाल करत मान्सून सोमवारी मुंबईत दाखल झाला. मात्र, सोमवारची रात्र वगळता मंगळवारसह बुधवारी पावसाने कुठेच हजेरी लावली नाही. उलट मागील दोन दिवसांपासून दाटून येत असलेल्या ढगांतून प्रखर सूर्यकिरणे डोकावत असून, उकाड्यात भर पडली आहे. परिणामी, ऐन पावसाळ्यातील वातावरणातील बदलामुळे मुंबईकर उकाड्यासह घामाच्या धारांनी हैराण झाले असून, पुढील दोन ते तीन दिवस असेच वातावरण राहील, अशी शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी नैऋत्य मोसमी पाऊस आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या, पश्चिम मध्य व वायव्य बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागात, दक्षिण छत्तीसगडच्या काही भागांत, ओडिशाच्या आणखी काही भागांत दाखल झाला आहे, तर दुसरीकडे सोमवारी मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने मात्र, दोन दिवसांपासून उघडीप घेतली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी दाटून येणाऱ्या ढगांचे प्रमाण अधिक आहे. त्यानंतर मात्र, प्रखर सूर्यप्रकाश आणि वाढता उकाडा मुंबईकरांचा घाम काढत असून, अशीच स्थिती आणखी दोन ते तीन दिवस राहाणार आहे.हवामान खाते काय म्हणते?मान्सून एखाद्या ठिकाणी दाखल झाला, म्हणजे संबंधित ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील, असे नसते. मान्सून दाखल झालेल्या ठिकाणी तो अॅक्टिव्ह झाल्यानंतरही अनुकूल वातावरणासाठी मान्सून प्रणाली कार्यरत राहाणे आवश्यक असते. मान्सूनमधील प्रणाली कार्यरत राहिल्यास, साहजिकच मुंबईमध्ये पावसाच्या सरी बरसतील.बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर-पूर्व भारतात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.राज्याला इशारा१५ जून : मराठवाड्यात बहुतांश, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल.१६-१७ जून : कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात बऱ्याच व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल.१८ जून : कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल.मुंबईसाठी अंदाज१५ जून : मुंबई शहरात आणि उपनगरात पावसाच्या काही सरी कोसळण्याची शक्यता आहे.१६ जून : शहरात व उपनगरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.