लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हवामानात होत असलेल्या नाट्यपूर्ण घडामोडींमुळे नाशिक आणि वलसाड येथे असलेल्या मान्सूनची उत्तरी सीमा आणि मुंबापुरीवरील पावसाचा रुसवा मंगळवारीही कायम होता. महत्त्वाचे म्हणजे, मान्सूनने ब्रेक घेतला असतानाच, मुंबई शहराच्या कमाल तापमानात वाढ झाली असून, हे कमाल तापमान ३३ अंशांवर पोहोचले आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण-गोव्यात मुसळधार पाऊस पडला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. २१ ते २४ जूनदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर मुंबई शहर आणि उपनगरावरील आकाश सामान्यत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २७ अंशाच्या आसपास राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, मागील आठवड्यातील सोमवारी मान्सून मुंबईत दाखल झाला. तेव्हापासून पडलेल्या तुरळक सरी वगळता, मान्सून सरी मुंबईवर रुसल्या आहेत. परिणामी, कमाल तापमानासह आर्द्रतेत झालेली वाढ मुंबईकरांचा घाम काढत आहे.
मान्सून एक्स्प्रेसला ‘ब्रेक’
By admin | Published: June 21, 2017 2:56 AM