मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून मुक्काम ठोकून असलेल्या मोसमी पावसाने अखेर रविवारपासून देश आणि राज्यातून माघार घेतली. हवामान खात्याकडून ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे २७ ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह राज्यभरातील हवामान कोरडे राहणार आहे.
मान्सूनने माघार घेतल्याने आता राज्यभरातील वातावरणात बदल होणार आहे. विशेषतः मुंबईमध्ये वातावरणातील हे बदल जाणवू लागले असून, ऑक्टोबर हिटच्या किंचित तडाख्याने मुंबईकरांना घाम फुटू लागला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना हवामान खात्याचे माजी अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले की, सध्या तापमानातील फरक पाहता पहाटचे किमान तापमान हे सरासरी पेक्षा ३ डिग्रीने अधिक म्हणून अपेक्षित थंडीचा अभाव तर दुपारचे कमाल तापमान हे सरासरी पेक्षा तीन डिग्री सेल्सिअसने कमी आहे म्हणून ऑक्टोबर हिटचाही अभाव जाणवतो आहे.
या दोन तापमानातील वाढलेला फरक हा वातावरणात वाढलेल्या आर्द्रतेला मारक ठरून पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होऊन सकाळी पडणारे दवीकरणही कमी होईल. त्याचबरोबर परवापासून निरभ्र आकाशासहित हळूहळू थंडीतही वाढ होईल.