मुंबई : महाराष्ट्रात दोन दिवस अगोदरच हजेरी लावणारा मान्सून आता मुंबईच्या वेशीवर आला आहे. येत्या काही तासांतच मान्सूनचे मुंबईत आगमन होण्याची शक्यता आहे. उत्तर पूर्व भारतातील बहुतांशी राज्यांत मान्सूनने मजल मारली आहे. उत्तर बंगाल, सिक्कीमसह पुणे व रायगडमध्येदेखील मान्सून पोहोचला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मान्सून अरबी समुद्राच्या मध्य भागांतील आणखी काही भागांत सक्रिय झाला आहे. शनिवारी रात्री मुंबईसह उपनगराला मान्सूनपूर्व सरींनी झोडपले. मुंबई शहरात ३४.३१, पूर्व उपनगरात ७.४१ तर पश्चिम उपनगरात १४.९३ मिमी पावसाची नोंद झाली.
राज्याच्या ३५% भागात दाखल- महाराष्ट्रात शनिवारीच आगमन केलेल्या ‘मान्सून एक्स्प्रेसने’ असाच वेग ठेवत रविवारी पुण्यात प्रवेश केला आहे. मान्सूनने अलिबाग, पुणे, मेडक, नलगौंडा, श्रीहरिकोटा येथपर्यंत मजल मारली असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. - पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, ३५ टक्के भूभागावर मान्सूनचे आगमन झाले आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.