लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे/मुंबई : कोकणच्या किनारपट्टीत दाखल झालेला मान्सून शनिवारी घाटमाथ्यावर कोल्हापूरमध्ये दाखल झाला. कोल्हापूर परिसरात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. येत्या दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्र व्यापेल आणि मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होईल, असा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मान्सूनने मध्य अरबी समुद्र, कोकणचा आणखी काही भाग, कर्नाटकाचा आणखी काही भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, कर्नाटकातील गदगपर्यंत मजल मारली आहे़ गोव्यासह कोकणात धुवाधार पाऊस पडत आहे. गुरुवार, शुक्रवार अशा सलग दोन रात्री मुंबई शहर आणि उपनगरांतही दमदार पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. नवी मुंबई, ठाणे परिसराला पावसाने झोडपून काढले. लालबाग, परळ, वरळी, दादर, माहीमसह माटुंगा येथे शुक्रवारी रात्री उशीरा पावसाने जोरदार हजेरी लावली. वांद्रे-कुर्ला संकुलासह कुर्ला, घाटकोपर येथेही सरी कोसळल्या. शनिवारी सकाळीही घाटकोपर, कुर्ला, सायन, माटुंगा, दादर आणि लालबागसह दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली. दिवसभर मुंबईवर ढग दाटून आल्याचे चित्र होते.विदर्भातही काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यात दुपारी अडीचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. देसाईगंज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात विक्रीसाठी उघड्यावर ठेवलेले शेतकऱ्यांचे १२ क्विंटल धान भिजले. तसेच काही धान वाहून गेले. कोरा, झडशी, पवनार, नंदोरी व आष्टी (शहीद) भागात पाऊस आला. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यात सर्वाधिक २९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. भंडारा, गोंदिया, वर्धा, आणि अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात पावसाने हजेरी लावली.बाप-लेकाचा मृत्यूनाशिक जिल्ह्यात चोंढी (ता. सिन्नर) येथे वीज पडून बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला तर पुतण्या जखमी झाला. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. रघुनाथ कोंडाजी मवाळ (वय ४५) व त्यांचा मुलगा मयूर (१८) अशी मृतांची नावे आहेत. पाऊस सुरु झाल्यामुळे चारा झाकण्यासाठी हे तिघे घरातून बाहेर आले. चाऱ्यावर प्लॅस्टिकचा टाकत असताना वीज कडाडली व त्यांच्या अंगावर कोसळली. पुतण्या प्रशांत हाही भाजला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विदर्भात चार जण दगावले : पूजा करण्यासाठी गावालगतच्या शेतात गेलेल्या आदिवासी कुटुंबियांवर वीज पडून चार जण दगावले तर सात जण जखमी झाले. गडचिरोली जिल्ह्यातील धन्नूर (ता. मुलचेरा) येथे ही दुर्घटना घडली. शामराव मुन्नी कन्नाके (५८), त्यांचा मुलगा रितेश (२५), जानकीराम वारलू तोडसाम (४८) आणि संदीप शिवराम कुसनाके (३२) अशी मृतांची नावे आहेत.