पुणे - मान्सूनने मंगळवारी (दि.११) राज्यातील जळगाव, अकोला, पुसदपर्यंत प्रगती केली आहे. उर्वरित राज्यात पोहोचण्यासाठी पोषक हवामान तयार झालेले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून आणखी काही भाग व्यापणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
राज्यातील निम्मा भाग मान्सूनने व्यापला आहे. सध्या मान्सून जळगाव, धुळे, बुलडाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे. तसेच संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापलेला आहे. मंगळवारी गुजरातमध्येही मान्सूनने प्रवेश केला. दोन दिवसांमध्ये मान्सून तेलंगणा आणि छत्तीसगडच्या आणखी काही भागांमध्ये मजल मारेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
आज इशारा कुठे? बुधवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये बहुतांश ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागांमध्ये ‘येलो अलर्ट’ आहे. पुढील ४८ तासांमध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, बीड, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव, अहमदनगर, सोलापूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला.
परभणीमध्ये सर्वदूर; २३ मिलिमीटरची नोंद परभणी जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरापर्यंत सर्वदूर पावसाने हजेरी लावली. यामध्ये पाथरी आणि परभणी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसाने शहरातील अनेक सखल भागातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते.
बीडमध्ये सर्वच तालुक्यांत जोरदार बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सोमवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. चार मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. मंगळवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते.
वीज पडून दोघांचा मृत्यूअकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. एका घटनेत ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत एक युवक शेतात मृत आढळून आला. त्याचाही मृत्यू वीज कोसळून झाल्याचा अहवाल आहे. पहिल्या घटनेत, मूर्तिजापूर तालुक्यातील टिपटाळा येथील शालीग्राम श्रीराम डोंगरे (६५) हे त्यांच्या शेतात झाडाखाली थांबले असताना सायंकाळी वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ब्रह्मी खुर्द येथील तलाठी यांनी अहवाल दिला आहे. त्याचप्रमाणे, मौजे खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे (२६) हा शेतात मृत अवस्थेत आढळून आला.
सर्जा-राजाला वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजाचा मृत्यूशेतात जात असताना रेल्वे बोगद्यात साचलेल्या पाण्यातून बैलांची सुटका करत असताना सुकलाल लालचंद माळी (६३, रा. आसोदा, ता. जळगाव) या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी आसोदा ते मन्यारखेडा (ता. जळगाव) रस्त्यावर घडली. सोमवारी रात्री म्हसावद, रिंगणगाव, वाकडी व नांद्रा या चार महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील दहा मंडळांत झाली अतिवृष्टीजालना जिल्ह्याच्या विविध भागांत मंगळवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांत ४३.५० मिमी पाऊस झाला. त्यात जिल्ह्यातील १० महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात एका दिवसात सरासरी ४३.५० मिमी पाऊस झाला आहे.
लातूर : ३४ मंडळांत अतिवृष्टीलातूर जिल्ह्यात सोमवारी रात्री ३४ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतशिवारात पाणी पाणी झाले आहे. यातील ७ महसूल मंडळांत १०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
धाराशिव : २४ तासांत शंभर मिमीपेक्षा जास्तधाराशिव जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत सात महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. तर जिल्ह्यात सरासरी ४५ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला.