पुणे : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून राज्यात येत्या आठवड्यात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता कमी दिसून येत आहे. उत्तर भारतात वाटचाल करण्यासाठी अनुकुल वातावरण नसल्याने मॉन्सूनची प्रगती गेल्या ५ दिवसांपासून रखडली आहे. मॉन्सून सध्या मध्य प्रदेशापर्यंत पोहचला आहे.
गेल्या २४ तासात गुहागर १५०, काणकोण, मोखेडा ४०, दोडामार्ग, कुडाळ, माथेरान, पेडणे, केपे, रत्नागिरी, सावंतवाडी, वैभववाडी, वालपोई, वेंगुर्ला ३०मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय काही ठिकाणी हलका पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात गगनबावडा ५०, राधानगरी ४०, पन्हाळा, शाहूवाडी ३०, आजरा, चांदगड, सांगली २० मिमी पाऊस पडला. मराठवाड्यातील अंबेजोगाई ६०, औरंगाबाद, मंथा ५०, हदगाव ४०, कळमनुरी, सेलू ३०, घनसावंगी, हिमायतनगर, हिंगोली, सेनगाव २०, औंधा नागनाथ, ,माजलगाव, परतूर १० मिमी पावसाची नोंद झाली होती. विदर्भात धारणी ५०, खारंघा ३०, आष्टी, चिखलदरा, काटोल, नारखेडा, वरुड २०, आर्वी बाभुळगाव, चांदूर, धामणगाव, मोर्शी १० मिमी पाऊस झाला होता. घाटमाथ्यावरील वळवण ३० मिमी पाऊस झाला असून अन्य ठिकाणी किरकोळ पावसाची नोंद झाली होती.
इशारा : २१ जून रोजी कोकण,गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पड्ण्याची शक्यता आहे. २२ व २३ जून रोजी कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. .........राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ ते २३ जून दरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २२ व २३ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
२१ जून रोजी नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात २१ जून रोजी वादळी वार्यासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.