मुंबई - यंदा मान्सून आठवडाभर लांबल्याची चिन्हे आहेत. एरवी १५ ते १७ मे दरम्यान अंदमानात धडकणारा मान्सून अद्यापही तिथे धडकलेला नाही. तो पुढील ७२ तासात तेथे धडकणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.अंदमान ते कोकण हा मान्सूनचा प्रवास साधारण १५ दिवसांचा असतो. अंदमानातील मान्सून केरळात येण्यासाठी ६ ते ८ दिवसांचा कालावधी लागतो. यंदा मान्सून २९ मेदरम्यान केरळात धडकेल, असा अंदाज याआधी हवामान खात्याने जाहिर केला असला तरी तो अंदमानातच आलेला नाही. पुढील ७२ तासात तो अंदमानच्या समुद्रात दाखल झाला तरी तेथून फक्त तीन दिवसांत केरळात येण्याची शक्यता धूसर आहे. यामुळे यंदाचा हा मोसमी पाऊस आता २ ते ३ जूनदरम्यानच केरळात येईल. तेथून कोकणात येण्यासाठी आणखी ४ ते ६ दिवस व मुंबईसाठी पुढे आणखी २ दिवस लागण्याचा अंदाज आहे. कोकण व मुंबई व्यापल्यानंतरच मान्सूनचा राज्याच्या अन्य भागातील प्रवास सुरू असतो.एकाचवेळी अंदमान व केरळकेरळ, लक्षद्विपचा समुद्र सध्या चिघळला आहे. वादळी वातावरण तिथे तयार झाले आहे. यामुळे अंदमान व केरळात मान्सून एकाचवेळी धडकणार का? अशीही चर्चा आहे.अंदामानामध्ये आलेल्या चक्री वादळामुळे, मान्सून अंदमानात उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. या आधी सुद्धा अंदमानात एक चक्रीवादळ येऊन गेले आहे आणि आत्ताही तेथे एक चक्रीवादळ आहे.त्यामुळे मान्सूनची गती काहीशी कमी झाली आहे. मात्र तरीही पुढील 72 तासात मान्सून अंदमानात दाखल होईल अशी अपेक्षा आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या चक्रीवादळाचा प्रभाव कायम राहिल्यास केरळात मान्सून लांबण्याची चिन्हे आहेत. - डॉ ए के श्रीवास्तव , ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ , पुणे हवामान विभाग
हवामान खात्याचा अंदाज चुकला; मान्सून आठवडाभर लांबला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 8:09 PM