मुंबई : राजस्थानातून परतीच्या वाटेवर निघालेल्या मान्सूनचा मुक्काम रविवारीदेखील गुजरात, मध्य प्रदेशात नोंदविण्यात आला असून, वेशीवर असलेला मान्सून येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रातील हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, याचा परिणाम म्हणून सोमवार आणि मंगळवारी राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील, अशी शक्यताही वर्तविली आहे.
कुठे, किती तीव्रता राहणार?११ ऑक्टोबर : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. विदर्भात मात्र हवामान कोरडे राहील.१२ ऑक्टोबर : कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. विदर्भात हवामान कोरडे राहील.१३ आणि १४ ऑक्टोबर : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल.
पुणे, नगरमध्ये तासात विक्रमी पाऊस-पुणे शहरात शनिवारी सायंकाळी ढगफुटीसारखा पाऊस पडला. ऑक्टोबर महिन्यात जितका पाऊस होतो, तेवढा एकाच दिवसात पडला. -अहमदनगर शहर व परिसरात शनिवारी ४० मिनिटांत ८० मिमी पाऊस पाऊस झाला. नेवासा तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला, तर राहुरी तालुक्यात वीज पडून दोघे जखमी झाले.-भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली.