लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू असतानाच मुंबापुरीत मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी लागत आहे. शनिवारी रात्रीसह रविवारी रात्रीही मान्सूनपूर्व पावसाने मुंबईत हजेरी लावली असून, बदलत्या हवामानामुळे सायंकाळाच्या हवेत किंचितसा गारवा आला आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागत असतानाच उकाडा मात्र कायम राहिल्याने मुंबईकर मान्सूनपूर्व पावसासह घामाच्या धारांनी ओलेचिंब होत आहेत.मागील आठवड्याभरापासून मुंबईतल्या वातावरणात हवामानात बदल होत आहेत. दुपार वगळता सकाळसह सायंकाळी मुंबईवर ढग दाटून येत आहेत आणि अशाच काहीशा वातावरणामुळे मान्सूनपूर्व पावसाची मुंबईत हजेरी लागत आहे. दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरात कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, मानखुर्दसह साकीनाका, मरोळ, अंधेरी, मालाड येथे मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी लागत आहे. विशेषत: शनिवारसह रविवारी मुंबईत ठिकठिकाणी पडलेल्या पावसामुळे रस्ते निसरडे झाले होते. परिणामी वाहनांचा वेग मंदावला होता.आज आणि उद्या मुंबईत पावसाच्या सरीभारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मौसमी पावसाची वाटचाल वायव्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरामच्या उर्वरित भागात, त्रिपुराच्या व आसामसह मेघालयाच्या बहुतांश भागात झाली आहे. राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असून, सोमवारसह मंगळवारी मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मान्सूनपूर्व सरींनी मुंबई चिंब
By admin | Published: June 05, 2017 5:22 AM