लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अपेक्षित श्रावण सरींची शक्यता २१ ऑगस्टपासून असताना त्याअगोदरच म्हणजे शनिवारपासून राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी विदर्भ-मराठवाड्यातील काही भागांत पावसाने सुमारे पंधरा दिवसांच्या खंडानंतर पावसाने हजेरी लावली. २५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या विविध भागांत पावसाची हजेरी राहील.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील जोर ओसरला असला तरी नाशिक व पुणे शहर, पश्चिम घाटमाथ्यावर पुढील ३ दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे. यंदाचा हा १९७२ च्या नंतरचा दुसरा मोठा पावसाचा खंड आहे, अशी माहिती माजी हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
मराठवाड्यात चार जिल्ह्यांत हजेरी
छत्रपती संभाजीनगरात २२ दिवसांनंतर हलका पाऊस झाला. हिंगोलीत १२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, तर जालना जिल्ह्यात तीन आठवड्यानंतर पावसाने हजेरी लावली.
१०० वर्षांमधील सर्वांत कोरडा ऑगस्ट?
यंदाचा ऑगस्ट हा १०० वर्षांमधील सर्वांत कोरडा ऑगस्ट महिना होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यंदाच्या ऑगस्टमधील पर्जन्यमान सर्वांत कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तांदळापासून सोयाबीनपर्यंत उन्हाळ्यात घेण्यात येणाऱ्या पिकांचे उत्पादन कमी होऊन त्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
पूर्व विदर्भात दिलासादायक
पावसाने विदर्भात हजेरी लावली. नागपुरात शुक्रवारी सकाळपर्यंत ३८.७ मिमी, भंडाऱ्यात सर्वाधिक १२० मिमी, चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये १०२ मिमी, गडचिराेलीमध्ये गुरुवारी रात्री ४७ मिमी, वर्ध्यात रात्री ४४ व दिवसा ११ मिमी पावसाची नोंद झाली. अकाेला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यातही हलका पाऊस झाला.
१९-२५ ऑगस्ट या जिल्ह्यांत बसरणार
कोकण : मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता.
विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार. बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधारची शक्यता.
मराठवाडा : हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांत १९ ऑगस्टला मुसळधार. लातूर, धाराशिव, बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र : नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात केवळ मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.