अकोला : मान्सून प्रणाली सक्रिय झाली असून, भूपृष्ठावरील पाण्याचे तापमानही वाढले आहे. यामुळे येत्या पाच ते सहा दिवसात राज्यात सर्वत्र मान्सून बरसणार असल्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे.दरम्यान, मान्सून लांबल्याने शेतकर्यांचे डोळे नभाकडे लागले आहे.गतवर्षी मान्सून वेळेवर म्हणजेच ७ जूनला सुरू झाला होता. विदर्भाचा विचार केला, तर यावर्षी त्याला उशीर झाला आहे. अकोला जिल्ह्यात सामान्यत: ११ ते १७ जूनपर्यंत मान्सून बरसतो. तथापि, यावर्षी या अंदाजानुसार तो चार ते पाच दिवस उशिराने येत आहे. यावर्षी मान्सून सक्रिय होताच हलकेसे चक्रीवादळ तयार झाले होते. त्यामुळे मान्सून प्रक्रियेची गती मंदावली होती. आता पुन्हा ती गती वाढली आहे.दरम्यान, कमाल तापमान, सकाळ व दुपारची आर्द्रता, वार्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकशावर आधारित कृषी हवामान शास्त्रज्ञांनी यावर्षी जून ते सप्टेबरपर्यंत महाराष्ट्रातील सहा स्थानिकांचा पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यात पश्चिम विदर्भ विभागात सरासरीच्या १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. अकोला जिल्ह्यात जून ते सप्टेबर या कालावधीत सरासरी ६८३.७ मिमी. पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कृषी हवामान विभागनिहाय मध्य विदर्भातील नागपूर जिल्ह्यात चार महिन्यात सरासरी ९५८ एकूण ९८७ मि.मी. पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस १०३ टक्के आहे. यवतमाळ जिल्ह्यात सरासरी व एकूण ८८२ मि.मी. पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसाची टक्केवारी १०० आहे. पूर्व विदर्भात शिंदेवाई (चंद्रपूर) जिल्ह्यात जून ते सप्टेंबरपर्यंत सरासरी व एकूण ११९१ मि.मी. म्हणजेच १०० टक्के पावसाचे अनुमान आहे. मराठवाड्यात परभणीला चार महिन्यात सरासरी ८१५ एकूण ८९६ मि.मी. म्हणजेच १०९ टक्के पाऊस होणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. कोकण विभागात दापोलीला सरासरी ३३३९ मि.मी. पावसची शक्यता वर्तविली आहे. हे जून जे सप्टेंबर महिन्यातील पावसाचे प्रमाण ९७.५ टक्के आहे. -खंड पडण्याची शक्यताअकोला, नागपूर आणि परभणी भागात पावसाचा खंड पडण्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. -विदर्भात सरासरी एवढ्या पावसाची शक्यता अकोला, यवतमाळ आणि शिंदेवाई (चंद्रपूर) येथे सरासरी एवढ्या पावसाची शक्यता असून, नागपूर येथे मात्र सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भाचा विचार केल्यास सरासरी एवढा पाऊस होण्याची शक्यता आहे.
आठवडाभरात राज्यात सर्वत्र मान्सून बरसणार
By admin | Published: June 16, 2014 7:55 PM