पुणो : महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून नियोजित तारखेपेक्षा 3 दिवस उशिरा शुक्रवारी मान्सून माघारी फिरला आहे. मान्सून परतत असताना राज्याच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी देशातून 1 सप्टेंबरला मान्सून माघारी परण्यास सुरुवात होते. राजस्थानच्या पश्चिम भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र यंदा त्याने 23 दिवस उशिरा हा प्रवास सुरू केला. त्यामुळे महाराष्ट्रातूनही मान्सून माघारी फिरण्यास उशीर होणार असल्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार 1 ऑक्टोबर या नियोजित तारखेपेक्षा यंदा 5 दिवस उशिरा राज्यातून त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर अनुकुल स्थिती नसल्याने मान्सूनचा परतीचा प्रवास रेंगाळला होता. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून अनुकुलता वाढल्याने वेगाने परतीचा प्रवास सुरू झाला. शुक्रवारी दिवसभरात मान्सून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काही भाग वगळता उर्वरित सर्व राज्यांमधून माघारी फिरला.
महाराष्ट्रासह झारखंड आणि छत्तीसगडमधील बहुतांश भागातून, पूर्ण मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, तेलंगण, कर्नाटक राज्यांच्या काही भागातून मान्सून माघारी फिरला आहे.
देशाच्या आणखी काही भागांमधून मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकुल स्थिती असून पुढील 48 तासांत तो देशाच्या बहुतांश भागातून परतेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)
मुंबईचा पारा 37 अंशावर
गुरुवारी मुंबई शहराचा कमाल तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअस एवढा नोंदविला होता. ऑक्टोबर महिन्यातील हे सर्वाधिक कमाल तापमान असून, गेल्या पंधरा दिवसांत मुंबई शहराचे कमाल तापमान सरासरी 34 अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. पुढील 24 तासांत मुंबईत सायंकाळी अथवा रात्री गडगडाटी ढग निर्माण होण्याची शक्यता असून, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 37, 25 अंशाच्या आसपास राहील.
ईशान्य मोसमी पाऊस वाटेवर
मान्सून दक्षिण भारतातून परतीच्या वाटेवर असतानाच पुढील 48 तासांत ईशान्य मोसमी पाऊस दक्षिण भारतात दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याच्या वतीने देण्यात आली. ईशान्य मोसमी पाऊस हा मुख्यत: उत्तर पूर्व भारतातील आंध्रप्रदेश, ओरिसा आणि तामिळनाडू राज्यांमध्ये कोसळतो. विशेषत: या राज्यातील किनारपट्टीवर ईशान्य मोसमी पाऊस कोसळण्याचे प्रमाण अधिक असते. दरम्यान, वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे जम्मू-काश्मिरमध्येही या काळातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.