लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधिमंडळाचे १० जूनपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक संपल्यानंतर म्हणजे जुलैमध्ये हे अधिवेशन होण्याची शक्यता असून, अंतिम निर्णय विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी येणार आहे, त्यानंतर दोन दिवसात नवी लोकसभा स्थापन झाल्यानंतर लोकसभेची आचारसंहिता संपुष्टात येईल.
आचारसंहितेचा परिणाम
राज्यात विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांकरिता निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या या भागात आचारसंहिता कायम राहणार असल्याने अधिवेशन पुढे ढकलण्यात आले.
बैठकच नाही झाली...
- राज्याचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारीच्या अखेरीस पार पडले. अधिवेशन संस्थगित करताना पुढील पावसाळी अधिवेशन १० जून रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
- राज्यात २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा पाचवा टप्पा पार पडल्यानंतर २१ मे रोजी विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
- मात्र, राज्यातील मतदान संपले तरी सत्ताधारी नेतेमंडळी इतर राज्यातील निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याने कामकाज सल्लागार समितीची बैठकच झाली नाही.