पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरु; एकनाथ शिंदेंनी नवीन मंत्र्यांची करुन दिली ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 11:20 AM2023-07-17T11:20:19+5:302023-07-17T11:21:27+5:30
Maharashtra Monsoon Session: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून ४ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.
मुंबई: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नवीन मंत्र्यांची ओळख विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना करुन दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधान भवनात आगमन झाले, त्यांनी सर्वप्रथम विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. अनेक कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतात, त्यामुळे या भेटीची चर्चा रंगली आहे.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून ४ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यावर विरोधकांनी आत्मविश्वास गमावला असून आपल्या कामातून आपण त्यांना उत्तर देऊ, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारला. तर राज्यात लोकशाहीच शिल्लक राहिली नसल्याची टीका विरोधकांनी केली. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाचा पहिला दिवस सत्ताधारी गाजवणार की विरोधक, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. राज्यात बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, बेरोजगारी, पाऊस नसल्याने खोळंबलेल्या पेरण्या, काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शिल्लक कापूस, शहरी भागातील अडचणी यांसह इतरही अनेक प्रश्न असताना सरकार त्यावर ब्र शब्दही काढत नाही. आता अधिवेशनात तरी या प्रश्नांवर चर्चा होऊन ते सोडवले जावेत, अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.