औरंगाबाद/नगर/सोलापूर/मुंबई: दोन ते तीन आठवड्यांच्या खंडानंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळणार आहे. मराठवाड्यातील अनेक भागांत शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला. अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या दक्षिण भागात शनिवारी मुसळधार पाऊस झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. जालना शहर व परिसरात पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील चार तालुके वगळता उर्वरित ठिकाणी समाधानकारक पाऊस पडला़ हिंगोलीत पावसाच्या सरी बरसल्या. बीड जिल्ह्यात एक- दोन तालुके वगळता पावसाने हजेरी लावली.
नाशिक जिल्ह्यात काही तालुक्यांतच पाऊस सुरू आहे. दिंडोरी, निफाड, येवला, देवळा तालुक्यात पावसाने खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. दोन महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. खान्देशात नंदुरबारमध्ये १० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री हजेरी लावली.
मुंबईकरांना दिलासा दीर्घकाळ विश्रांतीवरअसलेला पाऊस शनिवारी मुंबईत परतला आणि सायंकाळी शहर-उपनगरात जोर धरलेल्या पावसाने मुंबईकरांना पुन्हा एकदा दिलासा दिला. चार दिवस पावसाचे... २१, २२, २३ आणि २४ जुलै असे चार दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.