ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 14 - हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. नैऋत्य मोसमी वारे अंदमानात दाखल होण्यास पोषकस्थिती निर्माण होत असून मान्सून दक्षिण अंदमानाच्या समुद्रात आणि निकोबार बेटाच्या परिसरात येत्या 72 तासात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामानाच्या ‘डायनॅमिक’ प्रकारच्या प्रारूपांनी नोंदवलेली निरीक्षणे आणि प्रत्यक्ष घडणाऱ्या प्रक्रिया यांवरून ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने हा अंदाज वर्तवला आहे.
गेल्या महिन्यात मान्सूनचा प्राथमिक अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने यंदा मान्सून ९६ टक्के होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि गेल्या तीन आठवड्यांत परिस्थिती अनुकूल झाल्याने यावेळी देशभरात सरासरीहून जास्त पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़
सर्वसाधारणपणे दक्षिण पश्चिम मान्सूनचे आगमन २० मे रोजी अंदमानच्या समुद्रात होते. त्यानंतर२५ मेपर्यंत अंदमान बेट, श्रीलंकापासून म्यानमारपर्यंत आगमन होते़ त्यानंतर १ जून रोजी केरळ येथून प्रत्यक्ष भारतीय उपखंडात मान्सूनचा प्रवेश होतो़ त्यात काही वेळा पुढे मागे होतात. आताची पोषकस्थिती लक्षात घेता दरवर्षीपेक्षा साधारण ५ दिवस लवकर मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता आहे़. त्याची पुढील वाटचाल कशी असेल यावर तो केरळला आणि महाराष्ट्रात कधी पोहोचेल, हे समजून येईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.