मुंबई/गुवाहाटी/भोपाळ : मान्सून अखेर विदर्भात दाखल झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे अखेर दिलासा मिळाला. सध्या कोकण आणि विदर्भात मान्सून दाखल झाला असला तरी मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षाच आहे. मुंबईसह राज्यातील काही भागात रविवारपासून पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मान्सूनने बिहारमध्ये दमदार एन्ट्री केली. येत्या तीन दिवसांत तो मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश व्यापेल. हवामान खात्याने २६ जूनपर्यंत मध्य प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत पावसामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
आसाममध्ये पुरामुळे जवळपास पाच लाख लोकांना फटका बसला असून, १३६६ गावे जलमय झाली. तसेच १४ हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. आसाममध्ये २२ जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.
आता कुठे मान्सून? विदर्भाच्या काही भागात शुक्रवारी मान्सूनचे आगमन झाले आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत मान्सून महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या आणखी काही भागांत हवामान अनुकूल आहे. - कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग.