पुणे : ‘वायू’ चक्रीवादळाचा परिणाम ओसरल्यानंतर, आता पुढील ४ ते ५ दिवसांत मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून, तो कर्नाटकासह, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, दक्षिण कोकणातील काही भाग, गोवा या ठिकाणी येण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे़. येत्या २४ ते २५ जूनला मॉन्सूनचे संपूर्ण राज्यात आगमन होण्याची शक्यता आहे़ ‘वायू’ चक्रीवादळाची तीव्रता आता खूप कमी झाली असून, त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झाले आहे़. ते मध्यरात्री उत्तर गुजरातला धडक देण्याची शक्यता आहे़. याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ़. अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, मॉन्सूनची अरबी समुद्रातील शाखा आणि ईशान्य शाखा या दोन्ही शाखा एकाचेवेळी सक्रिय होत आहे़. येत्या ४ ते ५ दिवसांत मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, दक्षिण कोकणचा काही भाग, गोवा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूचा उर्वरित भाग, बंगालच्या उपसागराचा काही भाग येथे आगमन होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे़. त्यामुळे येत्या २० किंवा २१ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्राच्या सीमेवर येण्याची शक्यता आहे़. त्यानंतर पुढील ३ ते ४ दिवसांत म्हणजे २४ किंवा २५ जून दरम्यान संपूर्ण राज्यात मॉन्सूनचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे़. मॉन्सूनचे ८ जूनला केरळला आगमन झाल्यानंतर, अरबी समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळ निर्माण झाले़. त्यामुळे मॉन्सूनच्या पुढील वाटचालीला अडथळा निर्माण झाला़. ‘वायू’ चक्रीवादळाचे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झाल्याने मॉन्सूनच्या प्रगतीतील अडथळा दूर झाला आहे़. मॉन्सूनने १४ जूनला कर्नाटकातील म्हैसूरपर्यंत मजल मारली होती़. त्यानंतर गेले तीन दिवस तो तेथेच रेंगाळला आहे़. त्याच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे़. गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ धरणगाव ३०, भिरा २०, धर्मपुरी १९, डहाणू १४, माहूर १४, महाबळेश्वर १२ मिमी पावसाची नोंद झाली होती़. ......मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट १८ जून रोजी विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट, तर तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे़. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़. १९ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असेल़. ..........विदर्भात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे़. २० व २१ जून रोजी विदर्भात उष्णतेची लाट असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे़.
आठवडाभरात मॉन्सून राज्यात येणार : चक्रीवादळाचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 12:40 PM
येत्या २० किंवा २१ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्राच्या सीमेवर येण्याची शक्यता आहे़.
ठळक मुद्देकोकणात २४ ते २५ जूनला दाखल होण्याची शक्यता ‘वायू’ चक्रीवादळाची तीव्रता आता खूप कमी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट विदर्भात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता