पुणे : गेले काही दिवस ज्याची प्रतिक्षा सर्व जण करत होते. तो मॉन्सूनचे येत्या २ दिवसात शुक्रवारपर्यंत दक्षिण कोकण, गोवा, कर्नाटकाच्या काही भागामध्ये, आंध्र प्रदेश, तामिळनाडुचा उर्वरित भागात आगमन होण्याची शक्यता असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ़. अनुपम कश्यपी यांनी सांगितले़. बुधवारी अरबी समुद्रातील मॉन्सूनच्या शाखेने पुढे वाटचाल केली नसली तरी मॉन्सूनच्या ईशान्य शाखेची वाटचाल सुरु झाली असून त्याने गोलपारा, अलिपूरद्वार, गंगटोक येथे आगमन केले असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे़. गुरुवारी, शुक्रवारी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. ‘वायू’ चक्रीवादळाने मॉन्सूनच्या प्रगतीचा मार्ग रोखला होता़. आता त्याचा परिणाम नाहीसा झाल्याने मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकुल वातावरण निर्माण झाले असून येत्या २ ते ३ दिवसात मॉन्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, दक्षिण कोकण, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडुचा उर्वरित भाग, बंगालचा उपसागरातील आणखी काही भाग, ईशान्य भारतातील काही भाग, पश्चिम बंगाल, बिहार, सिक्कीम, झारखंड, ओडिशा या भागात मॉन्सूनचे आगमन होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरण आहे़. याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ़ अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, येत्या एक दोन दिवसात म्हणजेच २१ जूनपर्यंत दक्षिण कोकण, गोवामध्ये मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे़. त्यानंतर पुणे व मुुंबईमध्ये २२ जूनपासून पावसाला सुरुवात होऊ शकते़. त्यानंतर २३ जूनपर्यंत तो पुणे, मुंबईत स्थिरावेल़. त्यानंतर पुढील दोन दिवसात तो महाराष्ट्राच्या विस्तृत प्रदेशात पोहचले़ २५ जूनपर्यंत मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्रात व्यापण्याची शक्यता आहे़. गेल्या २४ तासात गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़. राजापूर ६०, अलिबाग ३९, महाबळेश्वर २३, मुंबई १८, रत्नागिरी १२, पणजी १६ मिमी पावसाची नोंद झाली होती़. बुधवारी दिवसभरात महाबळेश्वर येथे २०, कोल्हापूर ५, रत्नागिरी १६, पणजी, डहाणु ३ मिमी पावसाची नोंद झाली़.
इशारा : २० जून रोजी विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़. २० व २१ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता़ २२ व २३ जून रोजी कोकण, गोवा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़.