पुणे : गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात खोळंबलेल्या मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून गुरुवारी मान्सून केरळात धडकणार आहे. त्यामुळे ९ ते ११ जूनदरम्यान दक्षिण कोकण व गोव्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात, मालदीव -कोमोरीन क्षेत्र आणि नैर्ऋत्य व आग्नेय बंगालच्या उपसागराच्या भागात झाली आहे़ मागील २४ तासांत कोकण, गोवा व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. कोकणातील फोंडा येथे सर्वाधिक १३० मिमी पावसाची नोंद झाली़ वेंगुर्ला ९०, पणजी ७३, दोडामार्ग व मालवण येथे प्रत्येकी ६० मिमी पावसाची नोंद झाली़ दाभोलीम, मडगाव, सांगे, मार्मागोवा, केपे येथे जोरदार पाऊस झाला़ कुडाळ, म्हापसा, वाल्पोई, सावंतवाडी येथेही सरी बरसल्या. मराठवाडा व विदर्भातही काही भागात मान्सूनपूर्व पाऊस झाला. लक्षद्वीप, अंदमान-निकोबार, पोर्ट ब्लेअर, केरळ येथे सध्या चांगला पाऊस सुरू असून कर्नाटक, आंध्र प्रदेश किनारपट्टी भागात पाऊस सुरू झाला आहे़ (प्रतिनिधी)राज्यात तुरळकपुढील तीन-चार दिवस दक्षिण कोकण, गोव्यातील बऱ्याच ठिकाणी, उत्तर कोकण तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ >केरळात छत्र्या उघडल्याकेरळमध्ये मान्सून अवतरण्याआधीच वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने लोकांनी कपाटातील छत्र्या बाहेर काढल्या.
मान्सून उद्या केरळात धडकणार
By admin | Published: June 08, 2016 4:43 AM