मुंबई : परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून मंगळवारी मुंबईसहमहाराष्ट्रातून माघार घेईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र दिवसभर परिस्थिती अनुकूल नव्हती. मात्र बुधवारी मान्सूनच्या परतीची आगेकूच होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गेल्या २४ तासांत सिंधुदुर्ग (आळेगाव) ६८, कोल्हापूर (गडहिंग्लज) ६९ आणि आजरा येथे ११३ मिमी पावसाची नोंद झाली.भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याचा विचार करता मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस पुण्यात झाला. उत्तर महाराष्ट्रात कमी पाऊस पडला. दुसरीकडे परतीचा प्रवास सुरू केलेला मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. बुधवारी ताे मुंबईसह महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशातून माघार घेईल. मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्याने घामासह तापदायक वातावरणाचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, परतीचा मान्सून आता विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग, उत्तर-मध्य महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर कोकण, डहाणू, नाशिक, नांदेडमध्ये आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
आज मान्सून मुंबईसह महाराष्ट्रातून परतणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 6:29 AM