मुंबई - देशातील सर्वच राजकीय पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने पक्षांकडून आघाड्या, गाठीभेटी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर एबीपी माझा वृत्तवाहिनीने ऑक्टोबर महिन्यात सर्व्हे करुन मतदारांचा कौल जाणून घेतला आहे. त्यानुसार, राज्यात सेना-भाजपा एकत्र लढल्यास महाराष्ट्रात भाजपा-सेना युतीला 34 जागा मिळतील. तर काँग्रेस आघाडीला 14 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तसेच राज्यातील सक्षम नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना तर देशातील सक्षम नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पसंती आहे. त्यामुळेच एबीपीच्या सर्व्हेनुसार आजही महाराष्ट्राचा मूड 'केंद्रात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र' असेच सांगत आहे.
एबीपी माझ्याच्या सर्वेक्षणानुसार, राज्यात कुठल्याही पक्षाची युती किंवा आघाडी न झाल्यास भाजपाला सर्वाधिक मतदान मिळेल. त्यानुसार, भाजपा आणि मित्र पक्षांना 37.8 टक्के मतांसह 23 जागा मिळतील. तर काँग्रेस व मित्रपक्षांना 28.5 टक्के मतांसह 14 जागा मिळतील. राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे खासदार राष्ट्रवादीचे ठरतील. राष्ट्रवादीला 13.5 टक्के मतांसह 6 जागा मिळणार आहेत. तर, शिवसेनेला सर्वात कमी म्हणजे 8.5 टक्के मतांसह 5 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे उर्वरीत पक्षांना 11.7 टक्के मतदान मिळेल. पण, एकही जागा मिळणार आहे.
राज्यातील सर्वात सक्षम नेता म्हणूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच महाराष्ट्रातील जनतेनं कौल दिला आहे. फडणवीस यांना 19.3 टक्के मतदारांनी पाठींबा दिला. तर शरद पवार यांना 18.7 टक्के आणि उद्धव ठाकरेंना 11.8 टक्के नागरिकांनी सक्षम नेता मानले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर महाराष्ट्रातील 64 टक्के नागरिक समाधानी आहेत. तर राहुल गांधींना महाराष्ट्रातून 17.6 टक्के, सोनिया गांधींना 3 टक्के, मनमोहनसिंग 3.8 टक्के लोकांचा पाठींबा आहे. दरम्यान, एबीपी माझ्याच्या या सर्वेक्षणात सरकारच्या कामगिरीसह अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये जनतेनं भाजपाच्या बाजुनेच आपला मूड असल्याचे सूचवले आहे.