न्हावरे : न्हावरे (ता. शिरूर) परिसरात मॉन्सूनपूर्व पाऊस कमी प्रमाणात झाल्याने मूग उत्पादक शेतकरीवर्ग चिंतेत आहे. न्हावरे परिसरातील न्हावरे, उरळगाव, आंबळे, आंधळगाव, दहिवडी, पारोडी, अरणगाव या भागात मागील आठवड्यात एकच मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. पडलेला पाऊस हा कोणत्याच पिकाच्या पेरणीसाठी पुरेसा नसल्याने शेतकऱ्यांनी पिकाच्या पेरण्या केलेल्या नाहीत. मॉन्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्यास त्यानंतर केलेली मुगाची पेरणी चांगली साधून उत्पादन चांगले निघते. कारण जून-जुलै या दोन महिन्यांत मुगाच्या पिकासाठी अनुकूल हवामान असते. मात्र, या वर्षी मॉन्सूनपूर्व पाऊस कमी झाल्याने पेरणीसाठी जमिनीत ओल नसल्याने शेतकऱ्यांनी मुगाच्या पिकाची पेरणी केलेली नाही. न्हावरे परिसर हा मुगाच्या पिकाचे कोठार म्हणून ओळखले जाते. मुगाच्या खरेदी-विक्रीसाठी शिरूरच्या बाजारपेठेचे नाव राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र, येत्या आठवडाभरात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही, तर यंदा या परिसरातील मुगाच्या पिकाचे उत्पादन घटण्याची दाट शक्यता शेतकरी वर्गातून वर्तविली जात आहे. (वार्ताहर)
मॉन्सूनपूर्व पावसाअभावी मूग उत्पादक चिंतेत
By admin | Published: June 10, 2016 1:32 AM