मुंबई : शनिवारी मुंबई आणि उपनगरांत कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाने रविवारी मात्र विश्रांती घेतली. परिणामी वातावरणात झालेल्या किंचितशा बदलाने उकाड्यात वाढ झाली आणि मुंबईकर पुन्हा एकदा घामाने हैराण झाले. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीमुळे मान्सून मुंबईत दाखल होईपर्यंत तुरळक सरी पडतील, अशी आशा मुंबईकरांना होती. प्रत्यक्षात मात्र शनिवारच्या पावसानंतर रविवारी शहराकडे पावसाच्या ढगांनी पाठ फिरवली. तरीही येत्या २४ तासांत शहर आणि उपनगरांत मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवल्याने सोमवारी शहरात पुन्हा सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी पावसाची उत्तर सीमा रविवारी कायम होती. पुढील तीन दिवसांत नैर्ऋत्य मोसमी पावसाची वाटचाल मध्य व उत्तर बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, ईशान्यकडील राज्यांच्या काही भागात होण्यास परिस्थिती अनुकूल आहे. मागील २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. राज्यात ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागत असली तरी कोकण-गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. काही भागात कमाल तापमानात घट झाली आहे. (प्रतिनिधी)
उकाड्याने मुंबईकर त्रस्त
By admin | Published: June 13, 2016 5:25 AM