ठाणे - बदनामीची धमकी देऊन सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यामध्ये ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी विशेष मकोका न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले. एक हजार ७३१ पानांच्या या आरोपपत्रामध्ये ७६ साक्षीदारांसह संबंधित पुराव्यांचाही उल्लेख आहे.रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची लाचेची मागणी करणारी ध्वनिफीत परत करण्यासाठी खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगले, त्याची दुसरी पत्नी श्रद्धा आणि मेहुणा अतुल तावडे यांना खंडणीविरोधी पथकाने नोव्हेंबर २०१७ मध्ये अटक केली होती. सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी तपास करून गुन्हा दाखल केला. हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.आरोपी सतीश मांगले, श्रद्धा मांगले आणि अनिल वेदमेहता हे राधेश्याम मोपलवार यांना भिवंडी येथील हॉटेल शांग्रीला येथे भेटले होते. पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आणि स्वत: मोपलवार यांनी गुप्त कॅमेºयामध्ये केलेले रेकॉर्डिंग या दोन महत्त्वाच्या पुराव्यांचा उल्लेख आहे.दोन आरोपी फरारमोपलवार यांनी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केल्यानंतर गँगस्टर रवी पुजारीने त्यांना तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली होती. त्यामुळे रवी पुजारीचाही या गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून समावेश करण्यात आला. याशिवाय, भिवंडी येथील हॉटेल शांग्रीलामध्ये मोपलवारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये अनिल वेदमेहतादेखील सहभागी होता. या दोन्ही आरोपींचा शोध सुरू असून तसे आरोपपत्रात नमूद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली.
मोपलवार प्रकरणात १७३१ पानी आरोपपत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 3:36 AM