मुंबई : माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने क्लीन चिट दिल्यानंतर, ज्येष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी राज्य शासनाने मंगळवारी फेरनियुक्त केले.मोपलवार हे येत्या २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतरही विशेष पद देत, त्यांच्याकडे समृद्धी महामार्गाची जबाबदारी कायम ठेवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोपलवार यांच्या कार्यकाळात भूसंपादनापासून इतर बाबींमध्ये प्रकल्पाला गती मिळाली होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची उभारणी एमएसआरडीसी करीत असून, त्याची सूत्रे ही मोपलवार यांच्याकडे होती. विधिमंडळाच्या या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात मोपलवार यांच्यावर काही आरोप करण्यात आले आणि त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये २ वरिष्ठ पोलीस अधिकाºयांचाही समावेश होता.बोरीवलीतील एका मोठ्या भूखंडाच्या वाटपात मोपलवार यांची कोकण विभागाचे तत्कालीन आयुक्त म्हणून संशयास्पद भूमिका होती, असा आरोप करीत, काही आॅडिओ टेप बाहेर काढण्यात आल्या होत्या. तथापि, असा कोणताही भूखंडच नव्हता आणि तो मिळविण्यासाठी कोणी अर्जदेखील केला नव्हता. त्यामुळे त्यात मोपलवार यांचा संबंध असण्याचे काहीही कारण नाही, कथित सीडीमध्ये मोपलवार यांचा अन्य ठिकाणचा संवाद मोडूनतोडून जोडण्यात आला, असे स्पष्ट मत, जॉनी जोसेफ समितीने नोंदविल्याची माहिती आहे.मोपलवार हे एके काळी गाजलेल्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात सामील होते, असे आरोपही झाले होते. तथापि, मोपलवार हे त्या प्रकरणात आरोपी नव्हते, असा अहवाल तत्कालीन तपासणी यंत्रणेने चौकशी समितीला दिला. त्यामुळे तो मुद्दाही निरर्थक ठरला. समृद्धी महामार्गालगत काही अधिकाºयांनी जमिनींची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याच्या प्रकरणातही समितीला तथ्य आढळले नाही, असे सूत्रांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर, मोपलवार यांना एमएसआरडीसीच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे पुन्हा सोपविण्याचा मार्ग मोकळा झाला. याच प्रकरणात मोपलवार यांना सतीश मांगले नामक युवक आणि त्याच्या पत्नीने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. मोपलवार यांच्या तक्रारीवरून मांगले दाम्पत्यास ठाणे येथे अटक करण्यात आली.>अर्जित रजा मंजूरमोपलवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत ३ आॅगस्ट रोजी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. तथापि, तेव्हापासूनची त्यांची १४५ दिवसांची अर्जित रजा आता मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे या दिवसांचे वेतनदेखील त्यांना मिळेल. मोपलवार यांनी, सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले, तेव्हा त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना देण्यात आला होता.
मोपलवार पूर्वपदावर, ‘समृद्धी’ची सूत्रे पुन्हा सांभाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 5:35 AM