ठाणे : सनदी अधिका-याकडून खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या सतीश मांगलेसह तीन आरोपींना पुन्हा पोलीस कोठडीत घेतले जाणार आहे. मकोकाअंतर्गत या आरोपींचा ताबा खंडणीविरोधी पथकाने न्यायालयाकडे मागितला आहे.सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची लाच मागतानाची ध्वनिफीत परत करण्यासाठी त्यांच्याकडून लाच घेताना खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगले याला खंडणीविरोधी पथकाने दोन आठवड्यांपूर्वी अटक केली होती. मांगलेसोबत त्याची दुसरी पत्नी श्रद्धा आणि मेहुणा अतुल तावडे यांनाही पोलिसांनी अटक केली होती. हे तिन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.दरम्यान, मांगले याच्याविरोधात दिलेली तक्रार मागे घेण्याची धमकी राधेश्याम मोपलवार यांना, कुख्यात गँगस्टर रवी पुजारी याने दिल्याचे प्रकरण मंगळवारी समोर आले. त्यानुसार, सतीश मांगले याच्याविरुद्ध मकोका गुन्हा दाखल करण्यात आला. आता मकोकाअंतर्गत आरोपींचा पुन्हा ताबा घेण्यासाठी खंडणीविरोधी पथकाने बुधवारी न्यायालयास विनंती केली. त्यामुळे एक-दोन दिवसांत या आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. पोलीस कोठडीदरम्यान गँगस्टर रवी पुजारी याच्याशी असलेल्या मांगलेच्या संबंधांबाबत चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.श्रीलंकेचे दौरेसतीश मांगले हा श्रीलंकेला वेळोवेळी जाऊन आल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. त्याचे सिम कार्डही श्रीलंकेचे असून, श्रीलंकेचे एवढे दौरे करण्याचे कारण काय, याची चौकशी आता पोलीस यंत्रणा करणार आहे.
मोपलवार प्रकरण : सतीश मांगलेला पुन्हा पोलीस कोठडीत घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 2:40 AM