चिंचवड : पानिपतच्या रणसंग्रामात जरी मराठे युद्ध हरले, तरी त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन दिल्ली राखली. अन्यथा आज दिल्ली पाकिस्तानात असती. म्हणून तो आपला नैतिक विजय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहाससंशोधक पांडुरंग बलकवडे यांनी केले. सदाशिव बहिरवाडे क्रीडांगण, शाहूनगर, चिंचवड येथे सदाशिव बहिरवाडे प्रतिष्ठान आयोजित तीनदिवसीय राजर्षी शाहू व्याख्यानमालेत ‘पानिपतचा रणसंग्राम - एक शौर्यगाथा’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना बलकवडे बोलत होते. या प्रसंगी सदर्न कमांडचे कर्नल विजय जगदाळे, नगरसेवक जितू पवार, पंकज ढाके, कमलिनी जगताप, गजानन चिंचवडे, बापूसाहेब तोंडकर, जालिंदर पोखरकर, अनिल पाटील, चंद्रकांत दीक्षित आदी उपस्थित होते. मुख्य संयोजक नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. बलकवडे म्हणाले की, छत्रपती शिवाजीमहाराजांना स्वराज्याचे रक्षण आम्ही प्राणांची बाजी लावून करू, असे अभिवचन मावळ्यांनी दिले होते. ते पानिपतच्या रणसंग्रामच्या निमित्ताने शंभर वर्षांनंतरदेखील अक्षरश: पाळले. वास्तविक पानिपतचा प्रदेश हा स्वराज्यापासून हजारो मैल दूर होता. प्रत्यक्षात तेथे मावळ्यांचे स्वराज्य नव्हते; परंतु अखंड हिंदुस्थानावर आपला भगवा फडकावा, असे शिवाजीमहाराजांचे स्वप्न होते. शिवरायांच्या पश्चात संभाजी, राजाराम, ताराबाई, शाहू अशा त्यांच्या वारसांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रसंगी शर्थीची झुंज देत मावळ्यांनी स्वराज्याचे रक्षण केले. छत्रपती शाहूमहाराज यांनी आपल्या मुत्सद्दीपणाचा प्रत्यय देत मराठी तरुणांना मुगल साम्राज्याशी संघर्ष करण्याचा नवा ध्येयवाद दिला. यामध्ये बाजीराव या तरुणाने शाहूमहाराजांचे लक्ष वेधून घेतले. बाजीरावाने आपल्या पराक्रमाने हिंदुस्थानातील अनेक प्रांत काबीज करीत स्वराज्याचा परीघ वाढवला. इराणच्या नादिरशहाने दिल्लीवर आक्रमण केल्याने मोगल बादशाहाने मराठ्यांकडे मदत मागितली. या निमित्ताने मराठी फौजांनी वेळोवेळी दिल्लीचे रक्षण केले आणि त्या बदल्यात अखंड हिंदुस्थानावर चौथाईचा आणि सरदेशमुखीचा हक्क प्रस्थापित केला. इ.स. १७०७मध्ये औरंगजेबाच्या निधनापश्चात ५० वर्षांत म्हणजेच इ.स. १७५७मध्ये अटक ते कटक अशा अखंड हिंदुस्थानावर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकू लागला होता. महंमदशहा अब्दाली या महत्त्वाकांक्षी अफगाणी सम्राटाने वेळोवेळी आक्रमणे करीत दिल्लीचे तख्त काबीज करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी शर्थीची झुंज देत मराठ्यांनी त्याची आक्रमणे निष्प्रभ करीत दिल्लीच्या मोगल तख्ताचे रक्षण केले. (वार्ताहर)>इ.स. १७६०मध्ये ५० हजार सैन्य घेऊन अब्दालीने आक्रमण केले आणि सदाशिवरावभाऊ यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याबरोबर पानिपतचा रणसंग्राम झाला. ज्या मोगलांच्या रक्षणासाठी मराठे लढले, त्यांचे कोणत्याही प्रकारचे साहाय्य नाही, अन्नधान्याची पुरेशी रसद नाही, अशा विपरीत परिस्थितीत आणि परकीय मुलखात हा रणसंग्राम झाला. कुटुंबकबिला आणि बाजारबुणगे कुरुक्षेत्रावर कर्मकांडात गुंतल्याने लढाईकडे दुर्लक्ष झाले.ऐनवेळी युद्धनीतीचा बोजवारा उडाल्याने पराभव झाला. मराठे आणि अब्दाली अशा दोन्ही बाजूंकडील सुमारे एक लाख माणसे मारली गेली. केवळ आठ तासांत एवढी प्रचंड मनुष्यहानी होण्याच्या हा दुर्दैवी जागतिक विक्रम आहे. या युद्धात जिंकल्यानंतरदेखील अब्दालीने दिल्लीचे तख्त मराठ्यांकडे सोपवले म्हणून हा नैतिक विजय आहे. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले.
पानिपत युद्धात मराठ्यांचा नैतिक विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2016 2:21 AM