रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या अपघातांपेक्षा गेल्या वर्षभरात अपघातांची संख्या कमी असली तरी १००पेक्षा अधिक प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. दीड हजारपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून, त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत अपघातांची व त्यामध्ये मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या कमी होणार नाही. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम अधिक वेगाने व्हावे, ही कोकणवासीयांची मागणी आहे. गेल्या चार वर्षांच्या काळात मुंबई - गोवा महामार्गावर दरवर्षी एक हजारपेक्षा अधिक अपघात झाले, त्यामध्ये दीडशेपेक्षा अधिक प्रवाशांचे बळी गेले होते. त्या तुलनेत जानेवारी २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत पनवेल ते कसाल या ४५० किलोमीटर अंतराच्या महामार्गावर ८९१ अपघात घडले. त्यामध्ये १११पेक्षा अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर या अपघातांमध्ये दीड हजार प्रवासी जखमी झाले. त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. मुंबई - गोवा महामार्गावर २०१०पासून २०१६ सालापर्यंत अपघातांची संख्या एक हजार ते दीड हजारच्या दरम्याने कायम राहिली आहे. त्यामध्ये प्रतिवर्षी सरासरी दीडशे ते दोनशे प्रवासी प्राणाला मुकले आहेत. ही स्थिती बदलावी व या महामार्गाची मृत्यूचा सापळा अशी बनलेली प्रतिमा बदलावी, म्हणून दोन दशकांपासून चौपदरीकरणाची मागणी सुरू होती. २०१३मध्ये मंजूर झालेल्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे दीड वर्षापूर्वी निवळी येथे उद्घाटन झाले होते. परंतु २०१८ मध्ये खºया अर्थाने चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. मात्र, २०१३ व त्याआधीपासूनही चौपदरीकरण होणार आहे म्हणून अस्तित्त्वात असलेल्या महामार्गाच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. त्यामुळे गेल्या पाच ते सात वर्षांमध्ये महामार्गाची स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. ही स्थिती अजूनही कायम आहे.महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रुंदीकरणाची जागा मोकळी करून घेतली जात आहे. संपूर्ण महामार्गावर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये चौपदरीकरणाच्य कामाने वेग घेतला आहे. तरीही चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास अजून दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र, या काळात जुन्या रस्त्यावरील खड्डे, खराब रस्त्याच्या ठिकाणी पॅचवर्क करणे आवश्यक आहे. चौपदरीकरणानंतर अपघात कमी होतील, अशी अपेक्षा अन्य महामार्गांच्या झालेल्या चौपदरीकरणानंतर व्यक्त झाली होती. परंतु ७० ते ८० प्रतितास वेगामुळे तेथेही अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
वाहतूक नियम पाळावेतमहामार्गावरील अपघातांचे प्रमाण पाहता रस्ते खराब झाल्याने अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु मानवी चुकांमुळेही अपघात वाढले आहेत. वाहनांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाहतूक नियमांचा सतत भंग होत असल्याने हे नियम पाळणे अत्यावश्यक झाले आहे.