औरंगाबाद : कोरोना, लॉकडाऊन यानंतर मन आणि शरीर या दोघांनाही वातावरणातील नकारात्मकतेमुळे एक प्रकारची मरगळ आलेली होती. ही मरगळ झटकून नव्या उमेदीने धाव घेण्याची गरज प्रत्येकालाच होती. त्यामुळेच रविवार, दि.१४ जून रोजी झालेल्या लोकमत व्हर्च्युअल रन या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवघा महाराष्ट्रच जणू नव्या उमेदीने धावला.‘लोकमत व्हर्च्युअल रन’ या उपक्रमात जमेल तसे आणि जमेल तिथे धाव घेऊन धावपटूंनी सहभाग नोंदविला आणि एक मुक्त, मोकळा, प्रेरणादायी श्वास घेतला. ‘लोकमत’ने नेहमीच फिटनेसचा पुरस्कार केला आहे. आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि अवघ्या महाराष्ट्रालाच या जनजागृतीपर उपक्रमात सामावून घेणे, यासारखे उपक्रम लोकमत महामॅरेथॉन आणि इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून कायमच घेत आहे. सध्याच्या कठीण प्रसंगात, तर फिटनेस राखण्याची गरज प्रत्येकालाच आहे. त्यामुळेच ‘लोकमत व्हर्च्युअल रन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विशेष पोलीस महानिरीक्षक, आयर्न मॅन, डेक्कनक्लिप हँगरचे विनर डॉ. रवींद्र सिंगल, आर्यन मॅन औरंगाबाद नितीन घोरपडे, लोकमत महामॅरेथॉनच्या संस्थापिका रुचिरा दर्डा, महामॅरेथॉन रेस डायरेक्टर संजय पाटील, नागपूर येथील पुखराज ग्रुपचे संचालक प्रशांत पिंपलवार, नेहा पिंपलवार, सेंट्रल प्रोव्हिन्शियल स्कूल नागपूरचे संचालक अॅड. निशांत नारनवरे, प्राईड ग्रुपचे संचालक नवीन बगाडिया आणि नितीन बगाडिया, व्हिजन मॅनुफॅक्चर आॅफ स्पोर्टस वेअरच्या संचालिका रूपा नीलेश मते, अल्ट्रा रनर अनिरुद्ध अथानी या मान्यवरांच्या हस्ते फ्लॅगआॅफ होताच धावपटूंनी धाव घेण्यास सुरुवात केली.३ कि.मी ५ कि.मी. १0 कि.मी.या तीन प्रकारांमध्ये व्हर्च्युअल रन घेण्यात आला. यामध्ये ३ आणि ५ कि.मी. या रनला धावपटूंचा सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला. कोणी मोकळ्या मैदानात, कुणी गच्चीवर, कुणी अंगणात, कुणी बागेत धावले; पण धावण्यामागचा उद्देश आणि आनंद प्रत्येकालाच सारखा मिळाला.३ कि.मी.चा प्रकार तर फॅमिली रन म्हणूनच ओळखला गेला. ज्येष्ठ नागरिक आणि बच्चे कंपनीनेही आपापल्या कुटुंबीयांसोबत या उपक्रमात सहभाग नोंदविला. लॉकडाऊननंतर जवळपास अडीच ते तीन महिन्यांनी घराबाहेर पडलो आणि मोकळा श्वास घेतला, अशी प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठांनी तसेच काही महिलांनी उत्स्फूर्तपणे दिली.पुन्हा एकदा ‘लोकमत व्हर्च्युअल महामॅरेथॉन रन’चा एक भाग असल्याचा मला आनंद वाटतोय. मी फ्लॅगआॅफनंतर बीड बायपासला वेळेत पूर्ण केली. व्हर्च्युल रन खरंच थरारक होती. ही धाव आपण पोलीस, डॉक्टर्स आणि या आव्हानात्मक परिस्थितीत असणाऱ्या ‘वॉरियर्स’ला समर्पित करतो.-डॉ. रविंदर सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक, तथा आयर्न मॅनरविवारी सकाळी १0 कि. मी. धावताना मला महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाºया सर्व धावपटूंमुळे प्रोत्साहन मिळत असल्याची भावना मनात होती. मोठा खंड पडला असला तरी आव्हानावर मात करण्यास आणि धावण्यास विसरलेला नसाल, असा विश्वास आहे. आपण घरी सुरक्षित असाल व सभोवताली असणाऱ्यांचे आधारस्तंभ असाल, असा विश्वास वाटतो. आव्हाने ही तात्पुरती असतात; परंतु विजय हा कायमचाच असतो.- रुचिरा दर्डा, संस्थापिका, लोकमत महामॅरेथॉन
नव्या उमेदीने धावला महाराष्ट्र; १० हजारांपेक्षाही जास्त धावपटूंनी नोंदविला सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 4:57 AM