स्नेहा मोरे लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशपातळीवर कोरोना मृत्युदरांत गेल्या तीन महिन्यांत घट झाली आहे, हे प्रमाण १.५५ टक्क्यांहून १.४५ टक्के झाले आहे. सध्या मुंबईचा कोरोना मृत्युदर ३.८ टक्के आहे, राज्याचा मृत्युदर २.५५ टक्के आहे. मात्र अजूनही राज्याच्या चार जिल्ह्यांत कोरोना मृत्युदर हा ३ टक्क्यांहून अधिक असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.राष्ट्रीय पातळीवरील मृत्युदराचे विश्लेषण पाहता तीन महिन्यांत हे प्रमाण कमी झाले आहे. सध्या सर्वाधिक मृत्युदर गुजरातमध्ये असून तीव्र संक्रमण काळात हा मृत्युदर २.४४ टक्क्यांहून १.७४ टक्के झाला आहे.
६ ऑक्टोबर रोजी राज्याचा मृत्युदर २.६४ टक्के होता, आता ६ जानेवारी रोजी हा मृत्युदर २.५५ टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे, या कालावधीत पॉझिटिव्हीटी दरही २०.२४ टक्क्यांहून १४.८८ टक्के झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याच्या दरातही वाढ होऊन याचे प्रमाण ८०.४८ टक्क्यांहून ९४.७९ टक्के झाला आहे.राज्यात मुंबईचा मृत्युदर सर्वाधिक असून याचे प्रमाण ३.८ टक्के आहे. त्यानंतर परभणी ३.७ टक्के, सांगली ३.५ टक्के, रत्नागिरी ३.४ टक्के मृत्युदर असल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली आहे.
याविषयी राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले, ज्या जिल्ह्यांमध्ये मृत्युदर अधिक आहे, त्या जिल्ह्यांचे साप्ताहिक स्वरूपात विश्लेषण करण्यात येत आहे. त्यामुळे यंत्रणांकडून मृत्युदर कमी करण्यासाठी लवकर निदान, उपचार करण्यात येत आहेत.
राज्यात कोरोना चाचण्यांत २३ टक्क्यांनी घटमागील दोन महिन्यांत राज्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण २३ टक्क्यांनी घटले आहे. राज्याच्या आऱोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ३६ लाख ८२ हजार ४६५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या काळात ४७ लाख ५५ हजार ८३१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. या कालावधीत दैनंदिन कोरोना चाचण्यांमध्येही घट झाली असून हे प्रमाण ७९ हजारांवरून ६१ हजारांवर आल्याचे दिसून आले. राज्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने परिणामी चाचण्याही कमी झाल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली आहे.