हेक्टरी ४0 लाखांहून जादा मोबदलागडकरी यांची घोषणा : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे भूमिपूजन; सागरी महामार्ग आता राष्ट्रीय महामार्गरत्नागिरी : रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाला आजपासून राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची घोषणा करतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी घेतल्या जाणाऱ्या जागेला हेक्टरी ४0 लाखांहून अधिक मोबदला देण्यात येईल, असे जाहीर केले. ३१ मे २0१८ रोजी चौपदरीकरणाचे काम १00 टक्के पूर्णत्वास जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी-खवटी (ता. खेड) ते वाकेड (ता. लांजा) या तीन टप्प्यात होणाऱ्या चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी मंत्री गडकरी यांच्या हस्ते निवळी (ता. रत्नागिरी) येथे झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण, संजय कदम, वैभव नाईक, प्रशांत ठाकूर, विधान परिषदेच्या आमदार हुस्नबानू खलिफे, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे केंद्राचे तसेच राज्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार उपस्थित होत्या.राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद सांभाळताना चार एक्स्प्रेस महामार्ग बांधण्याचे नियोजन केले होते. त्यातील मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्ग मार्गी लागला; मात्र नंतर सत्ता नसल्यामुळे उर्वरित मार्ग तसेच राहिले. त्यात मुंबई-गोवा एक्स्प्रेस महामार्गाचा समावेश होता. त्यावेळी राहिलेले काम आता पूर्ण होत आहे, असे गडकरी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी १0 हजार कोटी रुपये दिले जाणार असून, त्यातील तीन हजार ५३0 कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी झाल्याचे त्यांनी सांगितले. हा महामार्ग ‘ग्रीन एक्स्प्रेस महामार्ग’ असेल. त्यासाठी एकूण खर्चाच्या एक टक्का रक्कम म्हणजेच १00 कोटी रुपये सौंदर्यीकरण, देखभाल तसेच वृक्षारोपणासाठी राखून ठेवले जाणार आहेत. त्यासाठी स्थानिक संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.जैतापूर प्रकल्पग्रस्तांना प्रति हेक्टरी २२ लाख रुपये मोबदला देण्यात आला; मात्र महामार्गासाठी जागा देणाऱ्यांना हेक्टरी ४0 लाखांपेक्षा जास्त मोबदला दिला जाईल, अशी घोषणा गडकरी यांनी केली. ही आजवरची देशातील सर्वाधिक भरपाई असल्याचे ते म्हणाले. शहरी भागात दुप्पट तर ग्रामीण भागात चारपट इतकी भरपाई देण्यात येईल. त्यामुळे काही ठिकाणी हीच रक्कम एक कोटीपर्यंत जाईल, असेही ते म्हणाले.रखडलेला सागरी महामार्ग राज्य सरकारकडून केंद्राकडे सुपूर्द केला जाणार आहे. हा राष्ट्रीय महामार्ग असल्याचे आपण आज घोषित करतो, असे त्यांनी सांगितले. चार ते सहा महिन्यांत त्याचे विहित आदेश काढले जातील आणि त्यानंतर लगेचच त्यावरील राहिलेली कामे पूर्ण केली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. परदेशात ४0 टक्क्यांहून अधिक जलवाहतूक होते. ते प्रमाण आपल्याकडे तीन टक्के इतकेच आहे, असे सांगताना त्यांनी कोकणातही सागरी वाहतूक सुरू होण्यावर विशेष भर दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला गडकरी यांनी कोनशिलेचे अनावरण केले. नियोजित कार्यक्रमांना जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम भाषण केले. आता चर्चांचे दिवस संपून कृतीचे दिवस सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने बंदर धोरण आखले असून, त्याला पर्यटनाची जोड दिली तर कोकणात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील, असे ते म्हणाले. कोकणात होणाऱ्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे. त्यातूनच पाच हजार एकर क्षेत्रात जंगल उभे केले जाणार आहे. त्याचाही पर्यटन वाढीला लाभ होईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)ग्रीन रिफायनरी प्रकल्प सिंधुदुर्गातमुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबात कोणतीच माहिती पुढे आली नसल्याचे सांगत नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याला गडकरी यांनी आपल्या भाषणातून उत्तर दिले. हा पूर्णपणे प्रदूषणविरहित प्रकल्प असेल. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन जागा पाहण्यात आल्या असून, त्याला केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धमेंद्र प्रधान यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे.रत्नागिरी-कोल्हापूर आणि गुहागर-कऱ्हाड मार्गाचे काम लवकरचरत्नागिरी-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६च्या चौपदरीकरणासाठी दोन हजार ५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गुहागर - चिपळूण-पाटण-कोयना मार्गासाठी दोन हजार ५६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही दोन्ही कामे येत्या सहा महिन्यांत सुरू होतील, असे मंत्री गडकरी यांनी सांगितले....तर दिल्लीत राहायला नकोसागरी महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करीत आहोत; पण त्याचे विहित आदेश चार-सहा महिन्यांनी काढले जातील. कारण आपण केंद्रीय मंत्रिपद स्वीकारल्यापासून महाराष्ट्रालाच सर्वाधिक निधी दिला आहे. आता या नव्या कामाचा त्यात समावेश केला तर आपल्याला दिल्लीत राहायला नको, अशी अवस्था होईल, असे गडकरी यांनी सांगितले.६0, ४५ आणि ३0 मीटरमहामार्गाची नेमकी रुंदी किती असेल, याबाबत बऱ्याच चर्चा होत आहेत. ग्रामीण भागात महामार्गाची रुंदी ६0 मीटर, शहरी भागात ४५ मीटर, तर घाट क्षेत्रात ती ३0 मीटर इतकी असेल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.मेरीटाईम युनिव्हर्सिटीला ५0 लाखसागरी क्षेत्राशी निगडित जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम सुरू व्हावेत यासाठी मेरीटाईम युनिव्हर्सिटीची घोषणा आपण केली होती. या युनिव्हर्सिटीसाठी जिंदल कंपनीने जयगड येथे जागा देऊ केली आहे.येत्या तीन महिन्यांत तेथे काम सुरू होईल. त्यासाठी आपण ५0 लाख रुपये देत असल्याची घोषणा गडकरी यांनी केली.
हेक्टरी ४0 लाखांहून जादा मोबदला
By admin | Published: January 29, 2016 11:00 PM