पुणे : राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेने उष्माघात होणाऱ्यांची संख्या राज्यात वाढली आहे. मागील तीन महिन्यात महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीसेसच्या ‘डायल १०८’ या सेवेकडे राज्यभरातून तब्बल चार हजार ५२१ कॉल उष्माघाताचा त्रास झाला म्हणून आले आहेत. तीव्र झळांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील जनजीवन होरपळून गेले आहे. साहजिकच तेथील नागरिकांना उष्माघाताचा जास्त त्रास झाला. उन्हामुळे डोकेदुखी, ताप, थकवा, डिहायड्रेशन, चक्कर येणे अशी लक्षणे दिसून येतात. यावर वेळीच उपचार न झाल्यास या समस्यांचे स्वरुप तीव्र होते. प्रसंगी व्यक्ती बेशुद्ध होऊन तिला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. अशावेळी १०८ क्रमांक फिरवून अॅम्ब्युलन्स बोलविण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.याबाबत माहिती देताना महाराष्ट्र इमर्जन्सी सर्व्हीसेसच्या डॉ. ज्योत्स्ना माने म्हणाल्या, साधारणत: दरवर्षीच उन्हाळ््याच्या दिवसात डायल १०८ ला अशाप्रकारचे कॉल येतात. मात्र यावर्षी ही संख्या जास्त असल्याचे दिसते. साधारणत: फेब्रुवारी आणि मार्च वैशाख वणव्यामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढतात. राज्यभरातून फेब्रुवारीमध्ये १४०४ कॉल उष्माघाताच्या रुग्णांचे आले. तर मार्च आणि एप्रिलमध्ये अनुक्रमे १६०७ व १५१० कॉल आले. सर्वाधिक कॉल अमरावतीतून आले असून त्यांची संख्या ७७१ इतकी आहे. त्याखालोखाल यवतमाळमधून २५७ कॉल आले. उष्माघाताने मरण पावलेल्यांची सर्वाधिक संख्या विदर्भातच आहे. यशिवाय मुंबईतून २४८ कॉल उष्माघातासाठी आले. शासनाने २६ जानेवारी २०१४ रोजी ‘डायल १०८’ ही तातडीच्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)
राज्यात उष्माघाताचे ४५०० हून अधिक कॉल
By admin | Published: May 26, 2016 2:08 AM