पुणे : लॉकडाऊनमुळे राज्यातील अंगणवाड्या बंद झाल्या असल्या तरी महिला व बाल विकास विभागाकडून ७० लाखांहून अधिक बालके, गर्भवती महिला, स्तनदा माता, निराधार बालके, महिला, भिक्षेकरी यांना मदतीचा हात दिला जात आहे. गरजेनुसार त्यांना अन्नधान्य, औषधे पुरविण्याबरोबरच प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शनही केले जात आहे. अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स तसेच स्वयंसेवी संस्थाचा यामध्ये सक्रीय सहभाग आहे.राज्यामध्ये महिला व बाल विकास विभागाच्या सुमारे १ लाखांहून अधिक अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये ७० लाखांहून अधिक सहा वर्षापर्यंतची बालके तसेच, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला व स्तनदा माता यांची नोंदणी आहे. तसेच बालकांच्या ३६६ व महिलांच्या १६३ निवासी संस्थांमध्ये अनुक्रमे १० हजार ६६४ व १ हजार ६३४ प्रवेशित आहेत. एकुण १४ भिक्षेकरी गृहांमध्ये ३५० जण आहेत. अंगणवाड्यांमध्ये मुलांना पुर्व प्राथमिक शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या पोषणासाठीही प्रयत्न केले जातात. मुली व महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले जाते. औषधांचा पुरवठा, लसीकरणाची जबाबदारीही आरोग्य विभागाच्या मदतीने पेलली जाते. लॉकडाऊनमुळे अंगणवाड्या बंद असल्या तरी या सेवा मात्र बंद झालेल्या नाहीत. विभाग व स्वयंसेवी संस्थाचे सुमारे ७ हजार अधिकारी-कर्मचारी आणि एक लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका इतर विभागांच्या सहकार्याने बालके व महिला तसेच निराधारांना गरजेनुसार सेवा देत आहेत. त्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पालक, महिलांचे व्हाट्स अप ग्रुप तयार केले असून त्यावर लिखित किंवा व्हिडिओ स्वरूपात माहिती पाठविली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.निवासी संस्थांमधील दाखल सर्वजण निराधार आहेत. तिथे सॅनिटायझर, निर्जुंतुकीकरण, अन्नधानय, कपडे, स्वच्छता, विलगीकरण कक्षा या सर्व सुविधा दिल्या जात आहेत. संस्थांमधील बहुतेक जण उपेक्षित घटकांतील असून आजारी, वयस्कर, कमी वजनाचे, अंपग, मानसिक विकार असलेले, अशक्त असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. पण त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात असल्याने अद्याप या संस्थांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही, असे अधिकाऱ्यांनी नमुद केले.-----------------कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनाही अनेक ठिकाणी घडत आहेत. विभागाचे संरक्षण अधिकारी मोबाईलच्या माध्यमातून त्यासंदर्भात मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय देहविक्री करणाऱ्या महिला, रेशनकार्ड नसलेल्या महिलांना स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रेशन कीट दिले जात आहे. स्थलांतरीतांच्या निवारा केंद्रांतील महिला व मुलांचे समुपदेशन केले जात आहे. शहरी, ग्रामीण तसेच आदिवासी भागातही हे काम सुरू आहे.------------------
महिला व बाल विकास विभागाकडून मिळतोय ७० लाखांहून अधिक बालके, महिलांना आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 5:05 PM
राज्यामध्ये महिला व बाल विकास विभागाच्या सुमारे १ लाखांहून अधिक अंगणवाड्या
ठळक मुद्देअन्नधान्य, औषधे पुरविण्याबरोबरच प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शनअधिकारी, कर्मचारी, सेविका तत्पर